कोल्हापूर : लिंगायत समाजास स्वंतत्र धर्माचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेमध्ये लिंगायत धर्मास स्वतंत्र दर्जा देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. याबाबतीत केंद्र सरकारने शेट्टी यांना पत्राद्वारे हे उत्तर कळवले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेट्टी यांनी गतवर्षी १९ डिसेंबर रोजी लोकसभेत नियम ३७७ अनुसार सूचना मांडली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, लिंगायत समाजाचा स्वतंत्र ध्वज, धर्मग्रंथ आहे. महात्मा बसवेश्वर यांनी या पंथाची स्थापना केली आहे. या समाजास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी देशभरातील लिंगायत एकवटून रस्त्यावर उतरले होते. तरी त्यांच्या समाजास स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

यावर केंद्र सरकारने एका पत्राद्वारे त्यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, की लिंगायत व वीरशैव हा हिंदू धर्माचाच भाग आहे. त्यामुळे या समाजास स्वतंत्र धर्माचा दर्जा देता येणार नाही.