कोल्हापूर : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाच्या नव्या कार्यकारिणीत हस्तक्षेप केला आहे. त्यांनीच नव्या लोकांना आमच्या डोक्यावर बसवले आहे, असा आरोप कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. आमच्या कार्यकर्त्यांचा मागण्यांचा पक्षाने विचार केला नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी दिला.
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपामध्ये गेली तीन-चार वर्षे कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव सुरू आहे. जिल्ह्याच्या संघटनात्मक रचना बदलल्या, जिल्ह्याचे तीन भाग झाले. नियुक्त्यांमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना स्थान दिल नाही. जे स्थान दिले ते नगन्य आहे. जे पक्षाचे सभासददेखील नाहीत त्यांना पदाधिकारी बनवले गेले, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा – कोल्हापुरात मुसळधार पाऊस; शियेत ढगफुटीसदृश
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली आहे. त्याची शहानिशा केल्याशिवाय त्यांनी कोल्हापूरला येऊ नका, अशी भूमिका मांडली आहे. २०१४ साली राज्यात सरकार आले. या सरकारमध्ये स्वबळावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्ता आणली. २०१४ नंतर पक्षात इन्कमिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अनेकांना मीच पक्षामध्ये आणले आहे असा दावाही देसाई यांनी केला.
हेही वाचा – जनतेच्या पाठबळाने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले – हसन मुश्रीफ
पक्षातील सिस्टीम संपलेली आहे. आमची खदखद वरिष्ठांकडे मांडली आहे. त्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि भरत पाटील यांनी संपर्क साधला. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी आमचे समाधान झालेले नाही. भारतीय जनता पार्टी बचाव ही माझी भूमिका आहे. समरजित घाटगे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाच्या मोडतोडीला सुरुवात झाली. त्यांनी जणीवपूर्वक काही लोकांची नावे वगळली आहेत. आमचं आयुष्य मातीत घालून या पक्षासाठी काम केले. मात्र तो पक्ष मोडीत निघाला आहे, त्यासाठीच हा प्रयत्न आहे, असे देसाई म्हणाले.
शिवाजी बुवा, अजितसिंह चव्हाण, अनिल देसाई, एकनाथ पाटील, संभाजी देसाई आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.