दिवाळी हा गोडधोड खाण्याचा सण. पण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर चटणी भाकरी खाऊन निषेध आंदोलन करण्याची वेळ अपंगांवर आली. शासन निर्णयानुसार कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी अपंगांचा ३ टक्के निधी अपंगांच्या खात्यावर तत्काळ जमा करावा, या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने शनिवारी हे आंदोलन केले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी निधी थेट बँक खात्यावर जमा करण्याचे व उर्वरित मागण्यांसाठी १४ नोव्हेंबर रोजी बठक घेण्याचे आश्वासन दिले.
केंद्र शासनाने अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी समान संधी, संरक्षण आणि समान सहभाग कायदा १९९५ हा जानेवारी महिन्यापासून पासून लागू केला आहे.
या कायद्यातील तरतुदींनुसार सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंगांसाठी ३ टक्के खर्च करण्याचे आदेश करण्यात आले आहेत. याबाबत २८ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अपंगांच्या खात्यावर हा निधी जमा करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आजतागायत कसलाही निधी दिलेला नाही. त्यामुळे हा निधी अपंगांच्या खात्यावर तत्काळ जमा करावा, या मागणीसाठी शनिवारी ऐन दिवाळीत प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे मनपा आयुक्तांच्या निवासस्थानासमोर चटणी भाकरी खाऊन निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, शहर अध्यक्ष प्रशांत म्हेतर, शहर महिला अध्यक्षा शर्मिली इनामदार, संजय जाधव, संजय दळवी यांच्यासह कार्यकत्रे उपस्थित होते.