कोल्हापूर : गेले महिनाभर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात ऊस दर प्रश्नावरून शाब्दिक चकमकी सुरू होत्या. आता आंदोलन मिटल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करीत त्यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद दिले.
यावर्षीच्या तसेच गेल्या हंगामातील उसाला अधिक दर मिळण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीने आंदोलन छेडले होते. गेला महिनाभर आंदोलन सुरू असल्याने उसाचे गाळप थांबले होते. साखर कारखान्यांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन एक शासकीय बैठक घेतली होती. मात्र त्या बैठकीत राजू शेट्टी यांनी मंत्री मुश्रीफ यांनी सुचवलेला तोडगा अमान्य केला. त्यानंतर मुश्रीफ आणि शेट्टी यांच्यात वाकयुद्ध सुरू राहिले. यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता.आता हा प्रश्न मार्गी लागला आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनामध्ये सन्मानजनक तोडगा काढून गळीत हंगाम सुरळीत सुरू केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने आज मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. कालच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून आंदोलनातील सन्मानजनक तोडग्याबद्दल धन्यवाद मानले.
आज शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले, ऊसदर आंदोलनामध्ये शेतकर्यांच्या भावना, शेतकरी संघटनेची भूमिका आणि साखर कारखाने यांच्यामध्ये पालकमंत्री मुश्रीफ यांनी समन्वयाने चर्चा घडवून आणली आणि चांगला तोडगा काढला. शेतकरी संघटनेचे अविनाश मगदूम, कसबा सांगाव ग्रामपंचायत सदस्य दीपक हेगडे, संतोष मगदूम, कुमार पाटील, अनिल माने, निलेश चौगुले आदी प्रमूख उपस्थित होते.