सत्तेत असणारे भाजपा-शिवसेना एकमेकांना काळे फासत आहेत. संधी मिळेल तिथे शिवसेना भाजपाचे तोंड काळे करत आहे. तर, भाजपा शिवसेनेचा अपमान करुन काळीमा लावत आहे. काळया कारभारामुळे राज्याचा विकास होणार कसा? हे लोक कोल्हापूरचा तरी विकास कसा करणार, असा परखड सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे जाहीर सभेत केला.
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार रात्री प्रायव्हेट हायस्कूल येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीमधून काँग्रेस विरोधी प्रचार केला. मात्र जनतेसमोरील समस्या वाढल्या असताना सरकार कोठेही दिसत नसल्याने आज ‘कुठे आहे महाराष्ट्र माझा’ असा प्रश्न जनतेला पडला आहे. कोल्हापूर शहरासाठी निधी देत असताना भाजप, शिवसेनेचे सरकार तुम्हाला विसरले आहेत, मग मतदान करताना तुम्ही त्यांना विसरा असा टोला देखील लगावला. शिवसेनेला स्वाभिमान असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडून आपली धमक दाखवावी, असे आवाहन केले.भाजपकडे घोषणांचा कारखाना असून योजना आमच्या आणि नावे मात्र त्यांची असे सुरु असल्याचा आरोप केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप सरकारने समृध्द महाराष्ट्राला खिळखिळे करण्याचे काम केले, असे आरोप करुन कोल्हापूरचा विकास करण्यासाठी भाजपा-ताराराणी आघाडीला दूर ठेवून काँग्रेसकडे सत्ता सोपवावी, असे आवाहन केले.
माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, की आपण पालकमंत्री असताना कोल्हापूरच्या विकासाचा एकही प्रश्न मागे ठेवला नाही, पण विद्यमान पालकमंत्र्यांनी वर्षभरात एक रुपयाचाही निधी कोल्हापूरला दिला नाही.
माजी वनमंत्री पतंगराव कदम म्हणाले, काँग्रेसमध्ये राहून आत-बाहेर करणाऱ्याना निवडणूक प्रक्रियेतून वगळल्याने काम सोपे झाले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्याही आत्महत्या होऊ लागल्या आहेत.
माजी मंत्री सतेज पाटील यांनी, एकाच कुटुंबातील चार महाडिक वेगवेगळया पक्षात, आघाडीत असल्याने ते शहराचा विकास करण्याऐवजी शहरालाच चारही बाजूनी ओढून नेतील, अशी टीका केली.
जावई असतानाही स्मार्ट सिटी नाही
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कोल्हापूरचे जावई आहेत. मात्र तरीही भाजप सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये कोल्हापूरचा समावेश होत नाही हे कोल्हापूरचे दुर्देव आहे. भाजप सरकारने केवळ जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2015 रोजी प्रकाशित
एकमेकांना काळे फासणारे राज्याचा कसा विकास करणार?
अशोक चव्हाण यांची टीका
Written by अपर्णा देगावकर

First published on: 27-10-2015 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress president ashok chavan criticises bjp shiv sena