शहरातील अतिक्रमण कारवाईबाबत प्रशासनाला वारंवार सांगूनही कार्यवाही होत नसल्याने शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. यावर अधिकाऱ्यांनी अतिक्रमण कारवाईवेळी गाडय़ा हटवल्या जातात, परंतु नंतर त्या ठिकाणी परत गाडय़ा लावल्या जातात, असे सांगत आपली हतबलता आणि असमर्थता व्यक्त केली. याच वेळी अशा ठिकाणच्या गाडय़ा जप्त करण्याची धाडस दाखवत असले तरी त्याप्रमाणे कार्यवाही होण्याबाबत नगरसेवकांनी साशंकता दर्शवली.
३८० रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम करण्याचे काय झाले, असे विचारत सदस्य आक्रमक झाले. कित्येक वर्षे झाली त्यांना कायम करण्यात आलेले नाही. ५० लोक मृत झालेले आहेत. त्यातील जे आहेत ते सेवानिवृत्तीस आलेले आहेत. आता तरी त्यांना न्याय मिळणार का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगत प्रशासनाने वेळ मारून नेली.
शाळेच्या परिसरात खड्डे, दलदल, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर कार्यवाही केल्या जात नसल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. शाळेच्या परिसरातील मोठय़ा गटाराची पडझड झालेली आहे.
चेंबर पडलेले असल्यामुळे मोठय़ा पावसात गटारी तुंबून पाणी शाळा परिसरात पसरले जात असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. साफसफाईची कारवाई सुरू आहे. औषध फवारणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
१० वष्रे खोळंबली टाक्यांची सफाई
शहरातील पाण्याच्या टाकीची दुरवस्था आहे. त्या ठिकाणी बरेचदा स्वच्छता व गाळ काढण्यात आलेला नाही. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असून, ही बाब फार गंभीर असून तातडीने सर्व टाक्यांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर प्रशासनाने १० वष्रे टाक्यांची स्वच्छताच केली नसल्याचे सांगून टाकले. शहरामध्ये एकूण २९ टाक्या आहेत. त्यातील २५ टाक्या उंचावर आहेत. या टाक्या कर्मचाऱ्यांमार्फत साफसफाई करण्यात येतात किंवा मशिनरीद्वारे गाळ काढून स्वच्छ करण्यात येतात. यापूर्वी सन २००६ साली मशिनरीद्वारे गाळ काढून टाक्यांची स्वच्छता करण्यात आलेली आहे. एका टाकीला साधारण ४ ते ५ लाख स्वच्छतेचा खर्च असून, सर्व टाक्या स्वच्छ करण्याच्या खर्चाची रक्कम पुढील सभेवेळी सांगण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.