दिल्ली जिल्हा क्रिकेट मंडळात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या सहकार्याने घडलेल्या भ्रष्टाचाराविरोधात ‘आप’ची निदर्शने सुरू असताना तेथे भाजपच्या प्रयत्नानेच टोल रद्द झाल्याचा जल्लोष करण्यासाठी आलेले पक्षाचे कार्यकत्रे समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला. उभयपक्षाचे कार्यकत्रे परस्परांना भिडले. त्यातून शाब्दिक वादावादी निर्माण झाली. अखेर पोलिसांनी दोघांना स्वतंत्रपणे आपला कार्यक्रम करण्यास सांगितल्याने वादावर पडदा पडला.
दिल्ली जिल्हा क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अरुण जेटली यांच्या कार्यकाळात मोठय़ा प्रमाणात आíथक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचेच माजी कसोटीपटू कीर्ती आझाद यांनी ठेवला होता. या मुद्यावरून विरोधकांनी देशभर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत शनिवारी आपचे कार्यकत्रे येथील शिवाजी चौकामध्ये निदर्शने करण्यासाठी जमले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपचे संघटक नारायण पोवार, नीलेश रेडेकर, संदीप देसाई, मुनीर दाढीवाले, उत्तम पाटील, जयवंत पोवार आदी निदर्शने करीत होते.
याचवेळी भाजपने रस्त्यावर उतरून केलेल्या टोलविरोधी संघर्षांमुळे कोल्हापूर टोलमुक्त झाल्याचा दावा करीत पक्षाचे कार्यकत्रे याच जागी जल्लोष करण्यासाठी आले होते. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. टोलमुक्तीचा आनंद भाजप कार्यकत्रे व्यक्त करीत असताना बाजूलाच आपचे कार्यकत्रे जेटली विरोधात चेव येऊन प्रतिघोषणा करू लागले. त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना संयमाने आंदोलन करण्याचा सल्ला दिला, पण आपच्या कार्यकर्त्यांनी आम्ही परवानगी घेऊन आंदोलन करीत असताना, विनापरवाना आलेल्यांनी आगंतुक सल्ला देऊ नये, अशा शब्दांत प्रत्युत्तर केले. यातून उभयपक्षाचे कार्यकत्रे परस्परांना भिडले. शाब्दिक चकमकही झाली. तथापि, पोलिसांनी दोन्हीही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत करून आपला कार्यक्रम सनदशीरपणे पार पाडण्यास सांगितले.