scorecardresearch

‘अस्मिता’ जपणाऱ्या देणगीतून विद्यार्थिनींचे वसतिगृह !

सुदृढावस्थेत जन्मलेली बालिका ताप येण्याचे निमित्त होऊन वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच इंद्रियशिथिल बनते.

‘अस्मिता’ जपणाऱ्या देणगीतून विद्यार्थिनींचे वसतिगृह !

कोल्हापूर : सुदृढावस्थेत जन्मलेली बालिका ताप येण्याचे निमित्त होऊन वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच इंद्रियशिथिल बनते. तिला पूर्ववत करण्याचा संघर्ष आई-बापाचा सुरू होतो. हे मूल आता बरे होऊ शकणार नाही, या वस्तुस्थितीसह ते तिला जिवापाड सांभाळतात. आपल्या माघारी तिच्या आयुष्याची तरतूद म्हणून पै न पै जोडून ३५ लाख रुपयांची बचत करतात. वयाच्या ४५ व्या वर्षी ती मुलगी अखेरचा श्वास घेते. तिच्या जाण्याने कोलमडून पडलेले हे दाम्पत्य दु:खाच्या प्रसंगीसुद्धा सामाजिक भान ठेवणारा निर्णय घेतात. त्या मुलीचेच असणारे ३५ लाख रुपये तिच्याच स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करतात.

हा हृद्य सोहळा विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घडला. या निधीमधून विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थिनींसाठीचे वसतिगृह साकारले जाणार आहे.

 येथील पंडित सदाशिव मारुलकर आणि रजनी पंडित मारुलकर हे या ज्येष्ठ दाम्पत्याचे नाव. मारुलकर हे विद्यापीठातून साहाय्यक कुलसचिव पदावरून निवृत्त झाले. त्यांची कन्या अस्मिता हिच्या जीवनाची शोकांतिका ठरली. मुलीचाच अधिकार असलेल्या रकमेचा विनियोग स्वत:साठी न करता समाजासाठी करण्याचा निर्णय मारुलकर दाम्पत्याने घेतला.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी वसतिगृहाच्या प्रथम मजल्यावर ‘रजनी पंडित मारुलकर आणि पंडीत मारुलकर यांनी कन्या अस्मिता हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून या मजल्याचे बांधकाम झाले’ अशी कोनशिला दर्शनी भागात बसविण्यात येईल. मारुलकर दाम्पत्याने दातृत्वाचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. प्र-कुलगुरू डॉ. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी मारुलकर यांची सेवेमधील चोख कामगिरी आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यास सदैव तत्पर असलेल्या वृत्तीचा गौरव केला.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.