कोल्हापुरात चुरशीने मतदान

जिल्हा परिषदेच्या ६५ व पंचायत समितीच्या १३० मतदारसंघांसाठी ग्रामीण भागात आज मतदान झाले.

बहुतांशी मतदारसंघात अशा रांगा दिसून येत होत्या (छाया- राज मकानदार)

मतदानासाठी रांगा, गगनबावडय़ात सर्वाधिक ६७ टक्के मतदान

मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवण्यासाठी मंगळवारी संपूर्ण जिल्ह्यात चुरशीने मतदान झाले. मतदान शांततेत झाले असले तरी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना झालेली विषबाधा व एका पोलिसाला झालेली मारहाण यामुळे गोंधळ निर्माण झाला. सरासरी ६० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषदेच्या ६५ व पंचायत समितीच्या १३० मतदारसंघांसाठी ग्रामीण भागात आज मतदान झाले. प्रचाराची राळ जोरदारपणे उठल्याचा परिणाम मतदानावर दिसून आला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रांवर कायमपणे गर्दी दिसून आली. दुपारी दीड वाजता जवळपास निम्म्या म्हणजे ४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात आघाडीवर होता तो गगनबावडा तालुका. येथे ६७.३६ टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले होते. तर सर्वात कमी मतदानाची टक्केवारी शाहुवाडी तालुक्यात ३८ टक्के इतकी होती.  साडेतीन वाजण्याच्या सुमारास सरासरी ६० टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदान केले होते. डोंगराळ भाग असूनही गगनबावडा तालुक्यात ८०.५४ इतके भरघोस मतदान या वेळेपर्यंत झाले होते. याच वेळी शिरोळ तालुक्यात ५७ टक्के मतदान झाल्याची नोंद होती.

हातकणंगले, कागल, भुदरगड, करवीर आदी तालुक्यांचा फेरफटका मारला असता मतदानासाठी रांगा हे चित्र सर्वत्र होते. काही तालुक्यांमध्ये प्रशासनाकडून वेगळा उपक्रम राबवण्यात आल्याचे दिसून आले. भुदरगड तालुक्यात प्रांताधिकारी कीर्ती नलवडे यांच्या प्रयत्नाने फ्लेक्समुक्त निवडणूक झाल्याचे दिसून आले. संपूर्ण तालुक्यात कोठेही फ्लेक्स लागला नसल्याने सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण, त्यावरून होणारा ताणतणाव, उमेदवारांचा खर्च यावर नियंत्रण आल्याचे दिसून आले. शिये या गावामध्ये मतदानासाठी बराच वेळ लागत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत होत्या. वडणगे गावात काही मतदारांना व्हीआयपी वर्तणूक मिळत असल्याचे दिसून आले. मतदारांना वाहनांतून थेट मतदान केंद्रापर्यंत सोडले जात होते. यावरून कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. दुर्बल व्यक्तींना केंद्रापर्यंत आणण्यास ना नाही, परंतु सरसकट मतदारांना केंद्रापर्यंत नेण्यास आक्षेप घेतला.

पोलिसास मारहाण

कुशिरे तर्फ ठाणे गावात कर्तव्यावर असलेले कॉन्स्टेबल अभिजित शिपुगडे यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे सरपंच विष्णू पाटील व कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मतदान केंद्रात रांगेतून जाण्यावरून मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पोलिसांना विषबाधा

बंदोबस्तासाठी तनात राज्य राखीव दलाच्या १२ जवानांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना येथे घडली. या जवानांना जुलाब आणि उलटय़ांचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरण शेंडूरकर (अहमदनगर), पंकज जाधव (पुणे), महादेव रायते (अहमदनगर), बदाम सोनवर (बीड), तानाजी नाळे (अकलूज) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर अन्य सात जणांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Election in kolhapur kolhapur zp election

ताज्या बातम्या