कोल्हापुरात गवे, हत्तींचा उपद्रव; शेतकरी त्रस्त

शेतपिकांचे वाढते नुकसान, ग्रामस्थांमध्ये भीती

|| दयानंद लिपारे

शेतपिकांचे वाढते नुकसान, ग्रामस्थांमध्ये भीती

कोल्हापूर जिल्ह्यच्या ग्रामीण भागात गवा, हत्ती अशा जंगली प्राण्यांचा वावर वाढत आहे. त्यांच्याकडून शेतपिकांची मोठय़ा प्रमाणावर नासधूस होऊ  लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गव्याच्या कळपांचे अनेकांनी चित्रिकरण केले असून ते पाहून अनेकजण शेतात जाण्यासही घाबरू लागले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यतील दाजीपूर अभयारण्य हे गव्यासाठी प्रसिद्ध आहे. राधानगरी तालुक्यात असलेल्या या अभयारण्यातून गव्यांचा मानवी वस्तीत शिरकाव अलीकडे खूप वाढला आहे. पूर्वी गावाजवळ चुकूनही न येणारे गवे आता बारमाही गाव वस्तीजवळील शेतात सतत दिसून येत आहेत.

शेतात काम करताना वा अचानक समोर आल्यामुळे गवा – माणूस संघर्ष होत आहे. गेल्या वर्षी याच परिसरात एक महिला गव्यांच्या धडकेत मृत्युमुखी पडली होती. निपाणी – देवगड राज्यमार्गावर हत्तीमहाल येथे रस्ता ओलांडणाऱ्या गव्यांच्या कळपाचे नुकतेच करण्यात आलेले चित्रिकरण सध्या समाजमाध्यमावर फिरते आहे. राधानगरी वन्यजीव विभागाच्या कार्यालयाच्या आवारातच गव्यांचा वावर वाढू लागल्याने या खात्यापुढे हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. येथून राज्यमार्गावरून गव्यांची वर्दळ सुरू झाली आहे.

हत्तींचा धुमाकूळ

शाहूवाडी तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ चिंतेचा विषय बनला आहे. हत्ती आता दिवसाढवळय़ा मुख्य रस्त्यावरून बिनधास्त वावरत आहेत. हत्तीने अणुस्कुरा परिसरात बैलगाडीचा चक्काचूर केला. त्याने सोंडेत दुचाकी पकडून भिरकावून दिली. शेतातील पाण्याच्या जलवाहिन्या उपसून टाकण्याबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या ऊसपिकाचे मोठे नुकसान केले. शेतकरी वर्गाने हत्तीचा मोठा धसका घेतला आहे. शेतीपिकाचे दररोज नुकसान होत आहे. मात्र वन विभागाचे वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी भेट देत नसल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Elephant conflict in kolhapur

ताज्या बातम्या