दयानंद लिपारे

कोल्हापूर : सध्या सप्तपर्णीच्या फुलांचा (सातवीन) गंध आसमंतात भरून राहिला असताना काहींनी त्याची दुर्गंधी येत असल्याची तक्रार करीत त्याची तोड करण्याची मागणी चालवली आहे. समाजमाध्यमातही या वृक्षाबाबत अहमिकेने चर्चा झडत आहे. पर्यावरणप्रेमींनी मात्र सातवीन वृक्षाचे गैरसमज दूर करतानाच त्याची उपयुक्तता सांगायला सुरुवात केली आहे.

सातवीनचे फुले फुलली असताना त्यावर दुहेरी प्रतिक्रिया आहेत. त्याचा दरवळ अनेकांना मोहित करीत आहे. काहींनी त्याला उग्र वास येत असल्याने सातवीन वृक्ष तोडून टाकावेत, दुर्गंधी पसरते, श्वसनाचे विकार होतात, उग्र वासाने घसादुखी, डोकेदुखी, खोकला, मळमळ, उलटी असे त्रास होतात, अशी तक्रार चालवली आहे. हा विदेशी वृक्ष आहे. हे वृक्ष विषारी वायू वातावरणात सोडत असल्याने कर्करोग, अल्सर हे विकार जडतात. वृक्षांवर पक्षी आसरा घेत नाहीत, घरटी बांधत नाहीत, आदी आक्षेप नोंदवले जात आहेत.

हेही वाचा >>> उसाला प्रतिटन ३५०० रुपये द्या; अन्यथा कारखाने बंद-राजू शेट्टी यांचा इशारा

बहुगुणी देशी वृक्ष

या वृक्षाचे परागीभवन मधमाशा व कीटकांमुळे होते. याचे परागकण हवेत मिसळत नाहीत, वाऱ्याने हवेत पसरत नाहीत. सातवीन हा देशी वृक्ष असून विषारी वायू सोडत नाहीत. अनेक प्रकारचे पक्षी आसरा घेतात व घरटीही बांधतात. मधमाशा व अनेक कीटक फुलांवर घोंगावत असतात. हा औषधी वृक्ष असून आयुर्वेद ग्रंथात याचा उल्लेख आहे. साल कुष्ठरोग, यकृत विकारांवर तसेच मलेरिया, पोटदुखीवर व भूक वाढविण्यासाठी वापरतात. पाने जखमांवर बांधतात. यकृत दोषांवर मूळ वापरतात. चीक संधिवातावर व त्वचा रोगांवर वापरतात. असा हा बहुगुणी वृक्ष आहे. यात कडू, विषारी घटक असल्याने जनावरे तोंड लावीत नाहीत. या वृक्षास इंग्रजीत डेव्हील ट्री (सैतानाचे झाड) असे नाव असल्याने कदाचित वृक्षाबाबत गैरसमज तयार झाले असावेत, असे वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सांगितले.

ही काळजी घ्यावी

सातवीन बाबतचे हे सारे गैरसमज आहेत, असे मत डॉ. बाचूळकर यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, सातवीनच्या फुलांच्या वासाने दुर्गंधी नव्हे सुगंध पसरतो. वास थोडा उग्र आहे. या वासाची अ‍ॅलर्जी असलेल्या काहींना श्वसन, घसादुखी, डोकेदुखी, खोकला, उलटी असे त्रास उद्भवतात. पण वासाने इतर कोणताही रोग व विकार होत नाहीत. ज्यांना त्रास होतो अशा व्यक्तींनी तसेच जे दमा रुग्ण आहेत अशांनी आवश्यक काळजी घ्यावी. त्यांनी फार वेळ या वृक्षांखाली थांबू नये. वृक्ष फुलोऱ्यावर असताना तोंडावर रुमाल बांधावा. वृक्षावर फुलोरा १५ ते २० दिवस असतो, वर्षभर नसतो. यासाठी वृक्ष तोडण्याची आवश्यकता नसावी. थोडा संयम पाळा, इतकेच.