भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या नावे कथित हेल्पलाइन क्रमांक अनेक मोबाइलमध्ये आपोआप नोंदला गेल्याच्या प्रकारची सत्यता उघडकीस आली पाहिजे. यामध्ये दोषी असणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे. हा प्रकार सरकारी पाठबळातून घडला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत केला.

गेल्या दोन दिवसांपासून अनेक मोबाइलमध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या नावे कथित हेल्पलाइन क्रमांक नोंदला गेल्याच्या प्रकरणावरून जोरदार चर्चा आहे. याबाबत आज चव्हाण यांनी एक ट्विट करून सरकारवर निशाणा साधला. याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिजभूषण पांडे हे गुगलच्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी दिलेल्या निर्देशावरून गुगलने ही कृती केली असल्याची माहिती पुढे आली आहे. वापरकर्त्याचे हक्क कोणालाही घेता येत नाही. परदेशात असे प्रकार घडल्यावर अब्जावधी रुपयांचा दंड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता मोबाईलमध्ये हेल्पलाइन क्रमांक नोंदला गेल्याने असल्याने दोषी असलेल्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

निवडणुकीवेळी भाजपा सरकारने मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. आता मात्र चार वर्षे झाली अद्यापही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावर सरकार मराठा आणि धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपा सरकारच्या कारभारावर चव्हाण यांनी जोरदार टीका केली. इतिहासात कधी नव्हे इतकी लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याची टीका त्यांनी केली. नागपूरचे पावसाळी अधिवेशन काही दिवसच चालले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी जनतेचे प्रश्न मांडले. मात्र वेळ मारून नेण्याच्या पलीकडे मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली नाहीत. केवळ घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र काही काम नाही. सरकारच्या घोषणा वास्तव पाहता भ्रमनिरास करणाऱ्या आहेत, असा आरोप देखील चव्हाण यांनी केला.