देशातील महिलांचा सहकारी तत्त्वावरील पहिल्या इंदिरा गांधी महिला सहकारी साखर कारखान्यास ११४ कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी शुक्रवारी आयडीबीआय बँकेने टाळे ठोकले. बँकेकडून या कारखान्याची लवकरात लवकर विक्री होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील महिलांचा सहकारी तत्त्वावरील पहिला कारखाना म्हणून तांबाळे (ता. भुदरगड) येथे या कारखान्याची सुरुवात झाली होती. व्यवस्थापनाचे नियोजन, आíथक गणित बिघडल्याने कारखान्याचे धुराडे फार काळ पेटते राहू शकले नाही. परिणामी सन २००३-४ ला स्वबळावर ऊस गाळप चालू केलेला हा महिला कारखाना चुकीच्या धोरणामुळे लवकर बंद करावा लागला. नंतर तो ‘गोदावरी शुगर्स’ यांना भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला. कारखाना सुरळीत चालू असताना संचालक मंडळ व ‘गोदावरी शुगर्स’ यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे संचालक मंडळाने तो पुन्हा ताब्यात घेतला. नंतर एक वर्ष स्वत: चालवून पुन्हा ‘शक्ती शुगर्स’ या खासगी कंपनीस भाडेतत्त्वाने दिला. परंतु, त्यांच्याशीही संचालक मंडळाचे जमले नाही. नंतर हा कारखाना बंद अवस्थेत राहिला. या कारखान्यावर जिल्हा बँक व आयडीबीआय बँकेचे कर्ज आहे. कर्जाची ही थकबाकी ११४ कोटींवर गेली होती. एकरकमी परतफेड (ओटीएस) खाली ८० कोटी रुपयांत ही तडजोड करण्यात आली होती. या परतफेडीसाठी २० जून ही अंतिम मुदत दिली होती.  परतफेड न झाल्याने आयडीबीआय बँकेने कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन कारखान्यास शुक्रवारी टाळे ठोकले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First women sugar factory in india ready to close
First published on: 25-06-2016 at 01:52 IST