विधानपरिषद निवडणुकीसाठी इच्छुकांकडून मोच्रेबांधणी सुरु झाली असून बुधवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी इचलकरंजी येथील विविध पक्षांचे नेते, नगरसेवक यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट घेतली असता त्यांनी पक्षाकडून उमेदवारी दिली जाणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले. तर, पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांच्या निष्क्रिय कार्यशैलीवर तोफ डागत त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागणे म्हणजे विनोद असल्याचे म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था गटातून जिल्ह्यातील एका जागेची निवडणूक जानेवारी महिन्यात होत आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षातून विद्यमान सदस्य महाडीक, सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे अशा चौघांनी उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. चौघांतील स्पर्धा उघड असतानाही परस्परांना भेटून सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न जारी आहे. या अंतर्गत बुधवारी सतेज पाटील यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची निवासस्थानी भेट घेतली. पाटील यांनी आपल्या उमेदवारीस सहकार्य करण्याचे आवाहन केले असता आवाडे यांनी आपणही इच्छुक असल्याचे नमूद करीत पक्षाकडून उमेदवारी मिळणाऱ्याच्या पाठीशी राहू असे स्पष्ट केले.
यानंतर सतेज पाटील यांनी माजी आमदार अशोक जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रिवद्र माने, मदन कारंडे, सागर चाळके, शहर विकास आघाडीचे नेते अजित जाधव आदींचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सहकार्याची मागणी केली. आमदार सुरेश हाळवणकर हे परगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या शहरांना भेटी दिल्या असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. आणखीही उमेदवार इच्छुक असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, १८ वष्रे आमदारकी असलेल्या महाडीकांनी पालिकांच्या विकासासाठी कसलेच योगदान दिलेले नाही. महापालिका निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया केल्याची तक्रार असताना त्यांनी उमेदवारी मागणे हा एक विनोदच आहे, असे म्हणत त्यांनी महाडिकांवर निशाणा साधला.