कोल्हापूर : ‘गोकुळ’ चा गाय दुधाला शासन अनुदानासह प्रतिलिटर ३८ रुपये खरेदी दर देण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. हा दर राज्यात सर्वाधिक असल्याचा दावा असला तरी तो शासन अनुदानाधारे केवळ एक महिन्यासाठी आहे. सध्या शासनाने गाय दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा >>> कोल्हापूर राष्ट्रवादीत धक्कादायकघडामोडी; जिल्हाध्यक्षपदावरून ए. वाय. पाटील यांचा पत्ता कट,आसुर्लेकर नूतन अध्यक्ष
गोकुळचा गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३३ रुपये इतका असून तो शासनाने निर्धारित केलेल्या दरा पेक्षा ६ रुपये इतका जादा आहे. थोडक्यात, गोकुळचा गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३३ रुपये व शासनाकडून मिळणारे ५ रुपये अनुदान असा प्रतिलिटर ३८ रुपये दर ११ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत दूध पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील उत्पादकांना मिळणार आहे. सध्या जवळपास ७ लाख लिटर इतके दूध गोकुळकडून संकलित केले जात असून शासनाकडून मिळणारे ५ रुपये अनुदान हे थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, असे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.