राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ म्हणून ओळख असलेल्या गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेतील गोंधळामुळे संचालक मंडळाचा कारभार प्रथमच चव्हाटय़ावर आला. आजवर गोकुळमधील संचालकांच्या मलईविषयी केवळ चर्चा व्हायची, पण या वेळी लेखा परीक्षकांच्या अहवालाआधारे गोकुळचे लोणी कसे व कोणी मटकावत आहे, याचा जाहीररीत्या पाढा वाचला गेला.

सत्ताधाऱ्यांचा कारभाराबरोबरच विरोधकांनी मांडलेले मुद्दे योग्य का, या पेक्षा गोकुळच्या प्रतिष्ठेला जात असलेला तडा, या संघाच्या भविष्यातील पतनाला कारणीभूत ठरणारा आहे. वार्षिक सभेच्या निमित्ताने गोकुळच्या संचालक मंडळाच्या मनमानी प्रवृतीवर प्रकाशझोत पडला असून यातून कारभारी मंडळी काही शिकणार का, हा प्रश्न मात्र उरला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ)  खेडोपाडय़ातील शेतकरी, शेतमजुरांच्या कष्टदायक जीवनात दूध उत्पादनाद्वारे आनंदाची वाहती अर्थगंगा आणली, पण वार्षिक सभेच्या निमित्ताने  गोकुळमधील गरकारभाराचे प्रथमच जाहीरपणे वस्त्रहरण झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांनी तीन तास चाललेल्या सभेत एकहाती किल्ला लढवत उपस्थित केलेले प्रश्न संचालकांना बोचणारे ठरले. बल्क मिटर खरेदीमुळे झालेला बारा कोटीचा तोटा, वारणा दूध संघापेक्षा गोकुळचा जादा भाडेखर्च, एकाच व्यक्तीकडील चोवीस टंॅकरमुळे वर्षांला एकोणीस कोटी रूपये वाहतूक खर्चाची उधळण, संचालकांच्या वाहन खर्चासाठी दोन कोटीची खैरात असे अनेक प्रश्न सभा अध्यक्ष विश्वास पाटील यांना मौन पाळण्यास भाग पाडणारे होते. बाजारात बारा हजार रूपयाला मिळणारा चॉप कटर अठरा हजार रूपयांना खरेदी का केला, या प्रश्नाला उतर देताना अध्यक्ष पाटील यांनी जिल्हा परिषदेतील या खरेदीची माहिती घ्या, असा सल्ला दिला. पण मुळात जिल्हा परिषदे मध्ये काय घडते या पेक्षा गोकुळमधील चढय़ा दराची खरेदी का केली यावर मात्र अध्यक्ष बोलण्याचे टाळत असल्याने गोकुळच्या एकूणच खरेदीत पाणी मुरत असल्याच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे सभासदांना जाणवले.