या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरवठय़ाअभावी अनेकजण रिकाम्या हाताने परत

सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे स्वागत करायचे तर गारठवणाऱ्या थंडीत झणझणीत मटण आणि त्याचा चविष्ट तांबडा-पांढरा रस्सा पाहिजेच. किंबहुना मांसाहारप्रेमी कोल्हापूरकरांची हीच पसंती असते. यंदा मटण  दरवाढीचा मुद्दा तापला असताना नेमके ३१ डिसेंबर याच दिवशी अन्न व औषध प्रशासनाने नियमांचे पालन होत नसल्याच्या कारणावरून मटण दुकानांवर कारवाई सुरु करीत दुकान बंद करण्याचे आदेश दिले. दुपारनंतर सामंजस्याने दुकाने सुरु झाली पण मागणी इतका पुरवठा होऊ  शकला नसल्याने मटणाची लज्जत चाखता न आल्याने कोल्हापूरकर हिरमुसल्या चेहऱ्यानेच नववर्षांचे स्वागत करीत राहिले.

३१ डिसेंबर साजरा करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापुरात हा जणू नवा सण स्वरूपात  साजरा केला जातो. पर्यटक, अभ्यागत यांची पसंतीही कोल्हापुरी मटणच असते. स्वाभाविकच तांबडा—पांढऱ्या रश्श्याशिवाय कोल्हापूरकरांत ‘थर्टी फर्स्ट’ साजरा होतच नाही. त्यासाठी सकाळपासूनच तयारी, धावपळ सुरु असते. पहिली पावले पडतात ती उत्तम प्रतीचे मटण मिळवण्यासाठी. सवयीप्रमाणे कोल्हापूरकर पसंतीच्या मटण दुकानात पोहचले खरे, पण दुकान मात्र ३१ डिसेंबर असूनही बंद. गोंधळलेल्या ग्राहकांनी माहिती घेतली तेव्हा अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे दुकाने बंद असल्याचे समजले. कोल्हापुरात मटण विक्री थंडावल्याने ग्राहकांची गैरसोय झाली.

प्रशासनाचे नियमावर बोट

काही मटण विक्रेते गर्दीचा फायदा घेऊन निकृष्ट दर्जाचे मटण विक्री करतात आणि त्यांनी दरही अव्वाच्या सव्वा वाढवला आहे, अशी तक्रार मटण दरवाढ विरोधी कृती समितीने केली आहे. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने कोल्हापूर महापालिकेच्या कत्तलखान्यात तपासणी करून कापलेल्या बकऱ्याचे  मटण विकले पाहिजे, अशी भूमिका घेतली. अन्य ठिकाणी सुरु असलेली मटण  विक्री थांबली. प्रशासन आपल्या नियमावर ठाम राहिले. तर,सूडबुद्धीने प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप मटण विक्रेत्यांनी केला.

निम्म्यावर मटण विक्री आणि हिरमुसलेले खवय्ये

या वादात मटण  मिळत नसल्याने कासावीस झालेल्या ग्राहकांनी ‘किमान आजचा दिवस नियम बाजूला ठेवा आणि मटण विक्री करा’, अशा प्रतिक्रिया दिल्या. चार दिवसांपूर्वी विक्रीचे निकष न पाळल्याने एका मटण दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करून दुकान बंद करण्याचे आदेश दिले होते. हीच प्रक्रिया आजही सुरु राहिली. अखेर प्रशासन व विक्रेते यांच्यात सामंजस्याने चर्चा होऊन मटण  विक्रीला परवानगी मिळाली. संध्याकाळी मटण मिळू लागल्याने ग्राहकांचा जीव भांडय़ात पडला, पण पुरेसा मटण पुरवठा होऊ  शकला नसल्याने मटणप्रेमी हिरमुसले होते. कोल्हापूर जिल्हा खाटीक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी ‘गतवर्षी चार टन मटण विक्री झाली होती, यंदा वादात ती निम्म्यावर आली’ असे मंगळवारी लोकसत्ताला सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy new year kolhapur mutton akp
First published on: 01-01-2020 at 01:16 IST