पत्नीच्या वियोगाने एकाकी पडल्याची भावना बळावल्याने पतीने पत्नीच्या वर्षश्राद्धादिवशीच मुलासह गळफास घेऊन जीवनाचा प्रवास कायमचा थांबवला. वळिवडे (ता. करवीर) येथे घडलेल्या या घटनेत मोहन भालचंद्र चरेगावकर (वय ५१) आणि त्यांचा मुलगा विनायक (वय २१) या पिता-पुत्रांनी इहलोकीचा प्रवास संपविला.
वळिवडे येथे राहणाऱ्या चरेगावकर यांच्या पत्नी वर्षांपूर्वी निवर्तल्या. तेव्हापासून मोहन हे आपण एकाकी पडल्याच्या भावनेने ग्रस्त होते. मुलगा विनायक याचे काय होणार याची चिंता त्यांना सतावत होती. चरेगावकर आणि मुलगा विनायक हे दोघेही मितभाषी असल्याने ते इतरांमध्ये जास्त मिसळणारे नव्हते. वर्षभर हे पिता-पुत्र नेहमी एकत्र असायचे. गतवर्षी डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमधून आयटी या विषयाची डिप्लोमा परीक्षा विनायक प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तो अभ्यासात अतिशय हुशार होता. त्याने ‘विनू चरेगावकर योगा इन मराठी’ या स्वत:च्या अॅपची नोंदणी केली होती. अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षांत प्रवेशही मिळाला; परंतु आईचा मृत्यू झाल्याने वडील एकाकी पडतील या भीतीने त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण थांबविले. वडिलांची सोबत करीत तो त्यांच्या मागे सावलीप्रमाणे असायचा. आईच्या निधनाच्या दु:खातून हे दोघेही सावरले नाहीत.
चरेगावकर यांनी नरसोबावाडी येथे वर्षश्राद्ध आयोजित केले होते. त्यासाठी पाहुणे आले होते. ते चरेगावकर पिता-पुत्र येण्याची प्रतीक्षा करत होते. पण इकडे घरी पिता-पुत्रांनी प्रतिमा पूजन केले आणि दोघांनीही गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी चरेगावकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, ‘आमच्या आत्महत्येस कोणालाही दोषी धरू नये. विरह सहन होईना म्हणून आम्ही जीवन संपवत आहोत.’
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात पत्नीच्या वियोगातून पती आणि मुलाची आत्महत्या
वळिवडे येथे राहणाऱ्या चरेगावकर यांच्या पत्नी वर्षांपूर्वी निवर्तल्या.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-05-2016 at 01:45 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband and son commits suicide