कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शक्ती महोत्सव वासंतिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १० आणि गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता श्री अंबाबाई मंदिरात शक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव सुरळीत पार पाडावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.

कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात दिनांक १० आणि ११ एप्रिल रोजी होणाऱ्या या शक्ती महोत्सवाचे उद्घाटन १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे व लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही दिवशी होणारे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले असतील.

हेही वाचा : …तर संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आले असते का ?राजू शेट्टी यांचा प्रतिप्रश्न

श्री अंबाबाई मंदिरामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या शक्ती महोत्सवाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी नवी दिल्ली येथील संगीतरत्न अकादमीचे दीपक जोशी, संगीत नाटक अकादमीचे संजयकुमार बलोनी, उपविभागीय अधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत इंगळे, मोटार वाहन निरीक्षक उदयकुमार केबळे, तहसीलदार सैपन नदाफ, तहसीलदार चंद्रशेखर सानप, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

श्री. येडगे म्हणाले, देशभरातील सात मंदिरांमध्ये होणारा हा महोत्सव कोल्हापुरातही होत असून या महोत्सवासाठी आवश्यक ती सर्व तयारी करावी. या महोत्सवासाठी उपस्थित राहणाऱ्या कलाकारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, असे सांगून लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन हा कार्यक्रम कोल्हापुरात घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण संगीत नाटक अकादमीच्या अधिकृत यु ट्यूब चॅनल वरुन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली

भारतातील प्राचीन मंदिरांचे पावित्र्य राखले जावे तसेच या मंदिरांच्या रुपाने अस्तित्वात असलेला मूर्त सांस्कृतिक ठेवा अधिक उजळून निघावा त्याचे पुनरुत्थान व्हावे, या उद्देशाने संगीत नाटक अकादमीने मंदिर महोत्सवांची संकल्पना अंमलात आणली आहे. त्यानुसार भारतातील सात मंदिरांमध्ये वासंतिक नवरात्रोत्सव काळात शक्ती महोत्सव घेण्यात येत आहे.

आसाम मधील कामाख्या मंदिर, हिमाचल प्रदेशामधील कांगडा येथील ज्वालाजी मंदिर, त्रिपुरा उदयपूर येथील त्रिपुरा सुंदरी मंदिर, गुजरात मधील बनासकाठा येथील अंबाजी मंदिर, झारखंड येथील सीता भूमी देवघर जय दुर्गा शक्तीपीठ (झारखंड), उज्जैन येथील हरसिद्धी मंदिर या शक्ती देवतांच्या तीर्थक्षेत्रांमध्ये शक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत हे शक्ती महोत्सव देशातल्या या विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत.

हेही वाचा : साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका

मंदिर महोत्सव ही मंदिरांच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाला चालना देणारी योजना असल्याचे संगीत नाटक अकादमीचे सचिव राजू दास यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूरच्या शक्ती महोत्सवात १० एप्रिल रोजी डॉ. सोमा घोष यांचे हिंदुस्तानी संगीत, बीजल हरिया यांचे कुचीपुडी नृत्य, सुखदेव बंजारे यांचे पंथी नृत्य, स्वर डान्स अकादमीचे गरबा नृत्य सादर होणार आहे. तसेच ११ एप्रिल रोजी दीपिका वरदराजन यांचे कर्नाटक संगीत, स्वप्ना नायक यांचे भरतनाट्यम, नवरंग फोक डान्स अकॅडमीचे लोकनृत्य (नवरता नृत्य), स्पंदन कला वृंद गुजरात यांचे गरबा नृत्य आयोजित करण्यात आले आहे.