कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीमध्ये शहरातील सहा ठिकाणच्या नाल्यातून प्रदूषण होत असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. वाढत्या प्रदूषणामुळे नदीपात्रातील पाणी रसायनयुक्त झाले असून पाण्याला काळसर रंग चढला आहे. यामुळे जलचरांना धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने पृथक्करण्यासाठी घेतले असून प्राप्त अहवाल आधारे कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्या आठवडय़ात नदीत मोठय़ा प्रमाणात मासे तरंगत असल्याचे आढळून आले होते. जलाशयातील प्राणवायूच्या कमतरतेमुळे हा प्रकार घडल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे होते. यानंतर आठवडाभरात कोल्हापूर महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कसलीच दखल घेतली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी आर. आर. पाटील, नायब तहसीलदार संजय मधाळे आदी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कोल्हापूर शुगर मिल आसवनी प्रकल्प, कसबा बावडा राजाराम बंधारा, सीपीआर रुग्णालय नाला, जामदार नाला, दुधाळी नाला, पंचगंगा घाट या प्रत्येक ठिकाणी नदी प्रदूषित झाल्याचे दिसून आले. कोल्हापूर शुगर मुळे नाल्यांमध्ये काळसर रंगाचे पाणी तर राजाराम बंधारा येथील राखाडी रंगाचे पाणी आढळले आहे, असे पंचनामा अहवालात नमूद केले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase pollution panchganga river ysh
First published on: 25-01-2022 at 02:19 IST