कोल्हापूर : पाटबंधारे विभागाचे नऊ कोटी रुपयांचे देयक न भरल्याने पाटबंधारे विभागाने इचलकरंजी शहराला होणारा पाणीपुरवठा मंगळवारी तोडला. यामुळे ४ लाख लोकसंख्येच्या शहराच्या पाणी टंचाईत भर पडल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.   इचलकरंजीला मजरेवाडी येथून दररोज ५४ एमएलडी पाणी उपसा केला जातो. कृष्णा नदीतील पाणीउपसा पोटी दरमहा ३६ लाख रुपये देयक भरावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण रक्कम न भरल्याने थकित रक्कम वाढत गेली. आज अखेर नऊ कोटी रुपये थकबाकी नगरपालिकेने भरावी अशी नोटिस आली होती. प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने पाटबंधारे विभागाने आज मंगळवारी पाणी उपसा बंद केला.

   कृष्णा योजनेला सतत गळती होत आहे. त्यामुळे आठ दिवस पाणी मिळत नाही. तर मध्यंतरी मोठे वादळ आल्याने विद्युत पुरवठा खंडित होऊन पाणी उपसा बंद केला होता. इचलकरंजीच्या पाण्याची संकटांची मालिका चालू आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. नगरपालिका आर्थिक अडचणीत सापडली असे कायम म्हटले जाते. सध्या घरफाळा वसुली मोठय़ा प्रमाणात सुरू असून मुख्याधिकाऱ्यांनी पाण्यासारख्या गंभीर विषयाकडे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.