मुश्रीफ यांच्यावर नवा आरोप

कोल्हापूर : महाविकास आघाडी शासनाच्या राज्यात घोटाळा करण्याची एक कला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विकसित केली आहे, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी १५०० कोटींचा तिसरा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या सोमय्या यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर मुरगुड पोलिसात मुश्रीफ यांच्या घोटाळ्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधतानाच मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा नवा आरोप केला.

ते म्हणाले, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने १५०० कोटींचा घोटाळा केला आहे. ही एक वेगळीच कला त्यांनी साध्य केली आहे. मुश्रीफ यांनी त्यांच्या ग्रामविकास खात्याच्या कामाची निविदा स्वत:च्या जावयाच्या कंपनीला दिली आहे; परंतु या कंपन्या अस्तित्वात नाहीत. त्याद्वारेच ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात मी तक्रार दिली आहे. त्याची दखल त्यांना घ्यावी लागेलच. अज्ञात कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून त्याद्वारे पैसे आपल्या कुटुंबाच्या खात्यामध्ये घेतले आहेत. यासाठी मी आज पोलिसांत तक्रार अर्जात पुरावे दिले आहेत, असेही ते म्हणाले.  अनिल परब आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. मला जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा खासदार भावना गवळींचा भागीदार सईद सईदखानला आज अटक केली. जनतेला लुटणारे घोटाळे उघड करणे हे माझे काम आहे. घोटाळे करणारे ईडीच्या समोर जाण्याऐवजी गायब होतात. हसन मुश्रीफ, आनंद अडसूळ रुग्णालयात दाखल झाले. काही लोक गायब होतात, असा टोला त्यांनी लगावला.