कोल्हापूर : रजत कन्झ्युमर्स,माउंट कॅपिटल या १० वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीतील ४९ कोटी ८५ लाख रुपये हसन मुश्रीफ यांच्या कंपनीत कसे जमा झाले हे त्यांनी कोल्हापूरकरांना सांगावे, असे आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी कोल्हापुरात येऊन दिले.ग्रामविकास मंत्री असताना हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या कंपनीला राज्यातील २७,८०७ ग्रामपंचायतीनी दरवर्षी ५० हजार रुपये द्यावेत असा जीआर काढला होता. हा १५०० कोटीचा घोटाळा मी उजेडात आणला. त्यावर मुश्रीफ यांनी जीआर रद्द केल्याचे सांगितले आहे. पण मुळात जावयाच्या फायद्यासाठी ठेका देण्याचा जीआर का काढला होता याचे उत्तरही त्यांनी द्यावे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ िशदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिले आहे.

शरद पवारांना आव्हान
नबाब मलिक, हसन मुश्रीफ, अस्लम शेख अशांवर कारवाई करून विशिष्ट जाती, धर्माना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईनंतर केली होती. त्यावर सोमय्या यांनी, भ्रष्टाचार करताना मुश्रीफ यांना धर्म आठवला नाही का? मागील वेळी मला कोल्हापूरमध्ये प्रवेश करू दिला नाही तेव्हा त्यांना धर्म आठवला नाही का ? अशी प्रश्नांची सरबत्ती केली. शरद पवार यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांचे जातीवादी विधान मान्य असल्याचे सांगावे, असे आव्हान सोमय्या यांनी दिले.

संजय राऊतांवर टीका
मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी संजय राऊत तसेच त्यांचे भागीदार सुजित पाटकर यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणार आहे. इकबाल चहल यांच्यावरही कारवाई होईल, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला.