महापुराच्या तडाख्याने रया गेलेल्या कोल्हापूरला मूळ रूपात आणण्यासाठी अवघे शहर कामाला लागले आहे. अडचणी, संकटावर मात करीत गावगाडा पूर्वपदावर आणण्यासाठी आबालवृद्धांनी कंबर कसली आहे. शहर पाणीपुरवठय़ाचे आक्रंदन कायम असताना स्वच्छता करण्याचे दिव्य पार करावे लागत आहे. मदतीचा ओघ कष्ट कमी करण्याबरोबरच दिलासादायक ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापुराने कोल्हापूर जिल्ह्याचे कंबरडे मोडले आहे. यातून सार्वजनिक ठिकाणी सावरण्याचे सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. महापुरामुळे शहराचे तसेच शहरातील रहिवाशांचे अपरिमित असे नुकसान झाले असल्याने सावरण्यासाठी मदतीचे अनेक हात उभे राहत आहेत. शहर स्वच्छतेसाठी लागणारे १५ लाख रुपये किमतीचे र्निजतुकरणासाठी २५ मेट्रीक टन ‘स्टेबल ब्लिचिंग पावडर’ व जलशुद्धीकरणांसाठी लागणारे २५ मेट्रीक टन ‘पॉली अ‍ॅल्युमिनियम क्लोराइड’ ग्रासीम इंडस्ट्रीजचे आदित्य बिर्ला ग्रुपने पुरवले आहे.

पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट

महापूर लोटून चार दिवस झाले, तरी कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कासवगती कारभारामुळे पिण्याचे पाणी दुर्मीळ झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट अजूनही शहरभर आहे. शिंगणापूर व नागदेवाडी पंपिग हाउस येथील पाणीपुरवठा सुरू करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचा कागदी दिलासा महापालिका प्रशासन देत आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरिता किमान आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने करवीरकरांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

स्वच्छतेला गती

पूर ओसरलेल्या भागात शुक्रवारी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेली आहे. दुधाळी, पंचगंगा तालीम रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, मुक्त सैनिक वसाहत, न्यू पॅलेस, रमणमळा व जाधवाडी या संपूर्ण परिसराची स्वच्छता करून ८५ डंपर कचरा, प्लास्टिक व गाळ उठाव करण्यात आला. धूर व औषध फवारणी, ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत आहे.

 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur city to work in flood abn
First published on: 17-08-2019 at 00:43 IST