शिवस्मारकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सनदशीर मार्गाने आंदोलन करत असताना मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम व काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दडपशाही केली आहे. ही घटना निषेधार्ह आहे. अशा प्रकारे शासन आंदोलनकर्त्यांचा आवाज दडपू पाहत आहे, अशी टीका कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

मुंबईतील शिवस्मारकाची कल्पना ही मूळची काँग्रेस पक्षाची आहे. अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बांधण्यासाठी काँग्रेस पक्षाने आघाडी काळात पावले उचलली होती. याकडे लक्ष वेधून पाटील म्हणाले, काँग्रेसने केलेल्या कामावर आपला हक्क सांगण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शिवस्मारकाचा कार्यक्रम तर आपल्या पक्षाचा खाजगी कार्यक्रम असल्यासारखे भाजप वागत आली आहे. सर्वाना सामावून घेवून कार्यक्रम करणे अपेक्षित असताना त्यावर मालकी सांगण्याची चुकीची प्रथा भाजप सरकार पाडत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवून आपला झेंडा रोवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाकडे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. उमेदवारी न मिळणाऱ्यातील एका प्रमुख नाराजाला उचलून त्याला उमेदवारी देण्याची वेळ भाजपवर आली आहे. नगरपालिका निवडणुकीत असेच दिसून आले होते.

जिल्हा परिषदेची निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस स्वतंत्रपणे लढवत आहे. गेल्या तीन निवडणुका स्वबळावर लढून पक्षाने जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्याचे काम केले आहे. किमान कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता पाटील यांनी फेटाळून लावली. भाजप व राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेस पक्ष निवडणूक लढवण्यात, नियोजनात कोठेही कमी पडला नाही. बहुतेक सर्व तालुक्यांमध्ये पक्षाचे मेळावे पार पडले असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदी निर्णयाचा खरा फटका ग्रामीण भागातील जनता, शेतकरी यांना बसला आहे. त्याचे पडसाद जिल्हा परिषद निवडणूक उमटणार असून भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

ताराराणी आघाडी काँग्रेसचीच 

निवडणुकांना सामोरे जाताना भाजप व ताराराणी आघाडी एकत्रित असते. त्यांना भाजपमध्ये जायचे नाही अशांना ताराराणी आघाडीचा पर्याय उपलब्ध असतो या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, ताराराणी आघाडी ही मूळची काँग्रेस पक्षाचीच आहे. पूर्वी या आघाडीने कोल्हापूर महापालीकेत करिश्मा करून दाखविला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ताराराणी आघाडी काँग्रेस पक्षालाच मदत करेल, असे संकेत पाटील यांनी दिले.

पत्रकार परिषदेला प्रल्हाद चव्हाण, सुरेश कुऱ्हाडे, सरला पाटील, बी. एस. माळी आदी उपस्थित होते.