कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्याकडून आता गांधीगिरी पद्धतीने वसुली करणार असल्याचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
ते म्हणाले, की पहिल्या टप्यात ४ थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्यात येणार असून त्यांना ९ जानेवारी एकरकमी थकबाकी भरण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा, सोमवार दि. ११ जानेवारी रोजी त्यांच्या दारात सनई, चौघडे वाजवून बँक अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळ घरी जाऊन वसुली करतील.
३१ डिसेंबर २०१५ अखेर जे १ कोटीच्यावर जे थकबाकीदार आहेत, त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उदयसिंगराव गायकवाड ऊस तोडणी वाहतूक संस्था ४६ कोटी १५ लाख रुपये, शेतकरी सहकारी तंबाखू संघ उद्योग समूह ३८ कोटी ८१ लाख रुपये, विजयमाला ऊस तोडणी संस्था ९ कोटी ४० लाख रुपये, कोल्हापूर जिल्हा बीज उत्पादक संघ व भोगावती कुक्कुटपालन संस्था ६ कोटी ५७ लाख रुपये यांच्याकडून थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.