कोल्हापूर, जिल्ह्यत काल झालेल्या मतदानादिवशी एकूण ७४.०८ टक्के मतदान झाले. करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ८३.९३ टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ६०.८७ टक्के मतदान झाले.
कोल्हापूर जिल्ह्यतील दहा विधानसभा मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया पार पडली. काही मतदारसंघातील मतदान केंद्रामध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान झाले. त्यामुळे संपूर्ण आकडेवारी मिळण्यास वेळ लागला. आज प्रशासनाने सविस्तर आकडेवारी प्रसिद्ध केली.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे — .चंदगड — ६८. ७६ टक्के, राधानगरी — ७५.१४ , कागल — ८१, कोल्हापूर दक्षिण— ७४ .५७, करवीर — ८३. ९३ , कोल्हापूर उत्तर — ६०. ८७, शाहूवाडी — ७९.९०, हातकणंगले — ७३. १०, इचलकरंजी — ६८. ३८ आणि शिरोळ ७४. ४१.
जिल्ह्यतील एकूण १५ लाख ८५ हजार पुरूष मतदारांपैकी ११ लाख ९४ हजार जणांनी काल मतदान केले. १५ लाख ७ हजार महिला मतदारांपैकी ११ लाख मतदारांनी आपला हक्क बजावला. एकूण ८१ इतर मतदारांपैकी २१ जणांनी काल मतदान केले.
दिवाळी खरेदीची संधी
जिल्ह्यतील विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना मंगळवारी नियमित कार्यालयात उपस्थित राहण्यास सवलत देण्यात आली. गेली तीन आठवडे सतत काम करणाऱ्या या अधिकारी, कर्मचारी यांना अन्यत्र लक्ष देण्यास वेळ नव्हता. काल निवडणुकीचे काम पूर्ण करण्यास अनेकांना वेळ लागल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी आज सुट्टी जाहीर केली. त्यामुळे आज बहुतेकांनी दिवाळी सणाची खरेदी सहकुटुंब करण्यावर भर दिला.