कोल्हापूर : जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष होण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. शनिवारी दिमाखदार शक्तिप्रदर्शनासह त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यड्रावकर चेंबर्स येथून अर्ज भरण्यासाठी ढोल-ताशांच्या निनादात व घोषणाबाजीच्या जल्लोषात प्रमुख मार्गाने मिरवणूक निघाली. ग्रामदैवत सिद्धेश्वर देवालय येथे यड्रावकर यांनी महाराजांचे दर्शन घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते. नागरिक, कार्यकर्ते, तसेच विविध घटकांतील समर्थक उपस्थित राहिल्याने शहरात उत्साहाचे वातावरण होते.

यावेळी संजय पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूरला आधुनिक सुविधा असलेली ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आवश्यक आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक, मिलिंद भिडे आदी नेते आघाडीसोबत असल्यामुळे शहराच्या विकासासाठी कमी पडणार नाही.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस

दरम्यान जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सोबत करणाऱ्या सावकार मादनाईक, मिंलिद भिडे, रमेश यळगुडकर, शैलेश आडके यांना भाजपमधून निलंबित का करण्यात येऊ नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस जिल्हाप्रमुख राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी बजावली आहे.

संजय पाटील यड्रावकर म्हणाले की, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत जयसिंगपूर शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे. नागरिकांच्या सुविधा वाढवणे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच शहराचा एकूण चेहरामोहरा उंचावण्यासाठी सातत्याने काम झाले आहे. नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल समाधान व्यक्त करत यड्रावकर म्हणाले की, जनतेच्या प्रेमावर आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरच मी निवडणुकीला सामोरे जात आहे. जयसिंगपूरच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, प्रकाश पाटील टाकवडेकर, सुभाषसिंह राजपूत, रणजितसिंह पाटील, प्रमोद पाटील, सुभाष भोजने, शीतल गतारे, मिलिंद भिडे, असलम फरास, काँग्रेसचे अमरसिंह निकम, धनाजी देसाई, अण्णासाहेब क्वाने, शैलेश आडके, राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र आडके, प्रकाश झेले, रमेश यळगुडकर, मिलिंद शिंदे, ॲड. संभाजी नाईक, धनाजीराव देसाई, राहुल बंडगर, आप्पासो खामकर, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, महेश कलकुटगी, अर्चना भोजने, जुलेखा मुल्लाणी, प्रियांका धुमाळे, साजिदा घोरी, हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव, फारूक कडबी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.