कोल्हापूर : सायंकाळी आलेल्या पावसाने कोल्हापूरसह जिल्ह्याला झोडपून काढले. सोसाटय़ाचा वारा, गारांचा वर्षांव, जोरदार पाऊस यामुळे अवघे शहर काही काळातच जलमय झाले होते. झाडे कोसळल्याने आणि विजेचा व्यत्यय, जलकोंडी, वाहतूक अडथळा यासारख्या अडचणी उद्भवल्या. पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात मोसमी पावसाचे आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने कळवले होते. आज दुपारी जिल्हा प्रशासनाने सायंकाळी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला.

 जिल्ह्याच्या पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. पाठोपाठ कोल्हापूर शहरात पावसाला सुरुवात झाली. जोरदार वारा वाहू लागला. विजांचा कडकडाट होत होता. गारा वेचण्यासाठी मुलांची झुंबड उडाली.

पावसाने तारांबळ

 तासाहून अधिक काळ जोरदार पाऊस सुरू होता. पावसामुळे गटारी नाले तुडुंब भरून वाहू लागो. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. अवघे शहर काही काळातच जलमय झाले. दुकानामध्ये पावसाचे पाणी घुसले. फेरीविक्रेत्यांची तारांबळ उडाली.अशातच रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. घरी परतण्याची लगबग भर पावसात सुरू होती. सोसाटय़ाचा वारा सुरू झाल्यावर नेहमीप्रमाणे महावितरणने वीज घालवली. शहराच्या काही भागांमध्ये वृक्ष कोसळले. यामुळे वाहतुकीत अडचणी निर्माण झाली.