कोल्हापूर : चंदगड तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे टोकाचे मतभेद असलेले पक्ष पालिका निवडणुकीसाठी एकत्र आल्याचा धक्का विरतो न विरतो तोच सोमवारी कागल, मुरगूड या राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील शहरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू उद्योग समूहाचे नेते समरजित घाटगे या नेत्यांनी पालिका निवडणुकीसाठी गळ्यात गळे घातल्याने अवघे कोल्हापूरकर चक्रावून गेले आहेत. हे दोन्ही नेते एकत्र येण्याची भूमिका उद्या, मंगळवारी पत्रकार परिषदेत विशद करणार आहेत.

गेले दोन दिवस दोन्ही गटांमध्ये मतभेद मिटवण्यासाठी चर्चा सुरू होती. अखेर ती यशस्वी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस – शाहू आघाडीची युती आज अधिकृतरीत्या निश्चित झाली. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने आणि घाटगे गटाचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत या आघाडीची पुष्टी केली. या आघाडीच्या निर्णयात काही प्रमुख कार्यकर्त्यांशी तातडीमुळे सल्लामसलत करता आली नाही याबद्दल हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

अनपेक्षित तह – मुश्रीफ

कागल नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या श्री छत्रपती शाहू आघाडीमध्ये अनपेक्षित राजकीय तह झाल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

संयुक्त विजयासाठी प्रयत्न – घाटगे

कागल व मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत शाहू आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या आघाडीचे नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया, असे आवाहन समरजित घाटगे यांनी केले आहे.

कागल पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शाहू आघाडी एकत्र आल्यामुळे स्थानिक राजकारणात भूकंपजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांचा अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष बाजूला ठेवत दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

कागल व तालुक्याचा सर्वांगीण विकास व राजकीय संघर्षातून मुक्तता तसेच एकत्रित शक्तीने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तर पूर्वी झालेल्या तालुक्यातील आघाड्यांचा दाखला दोन्ही बाजूच्या प्रसिद्धिपत्रकात देण्यात आला आहे. राष्ट्रवादी– श्री छत्रपती शाहू आघाडीने नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

दरम्यान आज दिवसभर या आघाडीबाबत उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत होती. पालिकेसमोर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांचा अंदाज घेताना दिसत होते. ‘हे खरे आहे की खोटे’ ‘असे होऊ शकते काय?’ अशा शंका विचारत दिवसभर खुमासदार चर्चा सुरू होत्या.