येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील भ्रष्टाचार प्रकरणी मंगळवारी विधानसभेत विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले.
विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे शिवसेनेचे भरतशेठ गोगावले, डॉ. संजय रायमूलकर आणि भाजपचे सुरेश भोळे यांनी हा विषय उपस्थित करत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील भ्रष्टाचार प्रकरणाचा पाढा वाचून शासनाचे लक्ष वेधून घेतले. तसेच दोषींवर कारवाईचे सूतोवाच गृहराज्यमंत्री केसरकर यांनी केले. या कृतीचे श्रीमहालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने आभार मानले आहेत.
केवळ लेखापरीक्षणात दोषी असलेल्या संबंधितांवर कारवाई न करता सर्व प्रकारच्या घोटाळ्यांतील दोषींवर कारवाई करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत भ्रष्टाचारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त करावी, अशी मागणी श्रीमहालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी आज केली आहे. िहदु विधिज्ञ परिषदेने देवस्थान समितीतील भ्रष्टाचाराला वाचा फोडली होती. यामध्ये देवस्थानच्या २५ हजार एकर जमिनीपकी तब्बल ८ हजार एकर जमीन गायब असणे, देवीच्या चांदीच्या रथामध्ये घोटाळा, दागिन्यांचा हिशोब नसणे आदी अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचा समावेश आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले; मात्र ही चौकशी कासवाच्या गतीने चालू असून देवनिधीवर डल्ला मारणारे आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यामुळे दोषींवर विनाविलंब आणि कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनासाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा कृती समितीने दिला आहे.
मनकर्णिका कुंडांचे काय करणार?
सध्या अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित स्मारक करण्याची प्रक्रिया चालू आहे. असे झाल्यास मंदिराच्या आवारातील दुकाने हटवावी लागणार आहेत. राज्य संरक्षित स्मारक घोषित करून आतील दुकाने काढण्यात येणार असतील, तर भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि मंदिरातील मनकर्णिका कुंडावर बेकायदेशीरपणे बांधलेले शौचालय आधी काढावे. ते भाविकांसाठी खुले करावे आणि मंदिराच्या पुरातन वारशाचे जतन करावे, अशी मागणीही श्रीमहालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने केली.
