कोल्हापुरात मटका किंग सलीम मुल्ला याने अतिक्रमण करत उभारलेले जनसंपर्क कार्यालय महापालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आले. सलीम मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसची नगरसेविका, माजी उप-महापौर शमा मुल्ला हे दोघं तसंच त्यांचे काही साथीदार संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) अटकेत आहेत.
एप्रिल महिन्यात यादवनगर येथे मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा व पथकावर मटका बुकी मालक सलीम यासीन मुल्ला, त्याचा भाऊ फिरोज यासीन मुल्ला आणि अभिजित आनंदा येडगे (तिघेही रा. यादवनगर) यांनी हल्ला केला होता. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरज जेरबंद केले होते. पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का गुन्हा दाखल केला आहे.
सलीम मुल्ला याने यादवनगर भागात अतिक्रमण करत जनसंपर्क कार्यालय थाटले होते. महापालिका प्रशासन या अतिक्रमणाकडे कानाडोळा करत होते. पोलिसांनी सूचना केल्यावर अतिक्रमण पथकाला जाग आली. गुरुवारी या विभागाचे अधिकारी, कर्मचारी या भागात पोहोचले. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने जनसंपर्क कार्यालय पुरते जमीनदोस्त केले आहे. या कारवाईचे स्वागत केले जात आहे.