शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात आज (सोमवार) कोल्हापुरातील शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला. तिन्ही जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी खासदार माने यांच्या घरावर मोर्चा काढला. त्यांची गद्दार खासदार अशी संभावना करून राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर हातकनंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर लगेचच त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. तर आज त्यांच्या कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील निवासस्थानावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला.

आक्रमक शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी –

संजय पवार ,विजय देवणे, मुरलीधर जाधव या तिन्ही जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी माने यांच्या घराजवळ जमले. यावेळी गली गली शोर है, धैर्यशील माने चोर है, उद्धव ठाकरेंशी बेईमानी आणि गद्दारी केल्याच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

स्वाभिमान असेल तर धैर्यशील माने यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि… –

खासदार, तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं?असे प्रश्न विचारण्यात आले. २०१९ मध्ये माने घराणे राजकारणात अडगळीत गेले होते. उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील माने यांना निवडून आणले. त्यांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी खस्ता खाल्या आहेत. त्यांचे आजोबा बाळासाहेब माने हे स्वाभिमानी होते. त्यांचा स्वाभिमान असेल तर धैर्यशील माने यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान यावेळी देण्यात आले. पोलिसांनी कितीही बंदोबस्त लावला, तरी आम्ही निवासस्थानी घुसणार असा इशारा देण्यात आला .

आंदोलक ताब्यात, मोठा पोलीस बंदोबस्त –

आक्रमक शिवसैनिक जेव्हा धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा काढला. तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. माने यांच्या घराकडे जाणारी सर्व रस्ते बॅरिकेटेड लावून बंद करण्यात आले होते. शिवाय जागोजागी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मानेंच्या घरी पोहोचण्याआधीच शिवसैनिकांना अडवण्यात आले. आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर मोर्चामुळे निर्माण झालेला तणाव निवळला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur shiv sainiks march on mp darhysheel manes house msr
First published on: 25-07-2022 at 14:49 IST