कोणा एकाच्या पारडय़ात स्पष्ट बहुमताचे दान पडले नसल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यात सर्वच पक्षांची कसोटी लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळात द्वितीय स्थानी असलेले महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील मुत्सद्देगिरीचा सामना या निमित्ताने होणार आहे. मात्र या सामन्याचा निकाल अवलंबून राहणार आहे तो शिवसेनेकडे. मातोश्रीवरून येणाऱ्या आदेशाने जिल्हा परिषदेच्या सत्तेची तिजोरी उघडली जाणार आहे. निकाल त्रिशंकू लागल्याने स्थानिक पातळीवर कितीही प्रयत्न केले तरी मुंबईचा ‘आदेश’ हाच सर्वस्वी निर्णायक ठरणार आहे. मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण कसे रंग धारण करते यावरच येथील जिल्हा परिषदेचा सत्ताबाजार अस्तित्वात येणार आहे. ‘कोल्हापूर जिल्हा परिषदेवर झेंडा आमचाच’ अशा वल्गना निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी जोरजोरात केल्या होत्या. त्यातील फोलपणा निकालाने उघडा पाडला. एकहाती सत्तेचे दावे हवेत विरले आणि हवेत उंचच उंच भराऱ्या घेणाऱ्या नेत्यांचे झेपावणारे विमान जमिनीवर आले. अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी यश मिळाल्याने उसने अवसान आणून आनंद व्यक्त करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोडीलाच सत्ता मिळवण्याचे दावेही रंग धारण करू लागले आहेत. दाव्यांमध्ये कितीही दमदारपणा असला तरी या क्षणी त्यात भरीवपणाचा अभाव दिसत आहे. याचे कारण सत्तासोपान गाठण्यासाठी लागणारा ३४ हा जादुई आकडा जमवणे. आज याचीच उणीव स्पष्टपणे जाणवत आहे. भाजप व दोन्ही काँग्रेस यांची आजच्या घडीला २७ जागांच्या आसपास गोळाबेरीज होत आहे.   निकाल त्रिशंकू असतानाही भाजप तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेचा दावा केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उघड चाललेल्या हालचाली प्रभावी दिसत आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी  हालचालीत  ‘गनिमी कावा’ ठेवला आहे. पालकमंत्र्यांचे मंत्रिमंडळातील स्थान, केंद्र व राज्यातील सत्ता, त्याचा स्थानिक विकासासाठी होणारा लाभ या पािठबा देणाऱ्या अन्य पक्षांना जमेच्या बाजू ठरणार आहेत.

त्याआधारे त्यांनी शिवसेना व राजू शेट्टी यांना मदतीची हाक घातली आहे. यापकी काहीही सांगण्या आणि करण्याजोगे पाटील-मुश्रीफ यांच्याकडे नाही, पण त्यांची भिस्त असणार आहे ती शिवसेना व शेट्टी यांची भाजप व चंद्रकांत पाटील यांच्या कामकाज, रणनीतीतील असणाऱ्या विरोधावर. निवडणूकपश्चात वातावरण सल झाले असले तरी शिवसेना व शेट्टी यांचा पालकमंत्र्यांवरील आक्षेप, राग कमी झाल्याचे कोठेही जाणवत नाही. अशा स्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्यातील मुत्सद्देगिरीचा सामना रंगतदार ठरणार आहे.

मातोश्रीची भूमिकाच निर्णायक

जिल्हा परिषदेतील सत्तेचे त्रांगडे सुटणे हे पूर्णत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी सेनेच्या शिरस्त्याला धरून तसे सांगूनही टाकले आहे.

ठाकरे यांच्या राजकारणात मुंबई महापालिकेचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या महापालिकेत शिवसेना व भाजप यांचे सत्तेचे गोत्र कसे जमते यावरच कोल्हापुरातील जिल्हा परिषदेतील भाजप-शिवसेना यांचे शुभमंगल होणार हे निश्चित.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur zilla parishad election result
First published on: 26-02-2017 at 00:21 IST