scorecardresearch

महादेवराव महाडिकांच्या पक्षविरोधी कारवाया

काँग्रेसमधील यादवी उफाळली

महादेवराव महाडिकांच्या पक्षविरोधी कारवाया

निवडणूक कोल्हापूर महानगरपलिकेची असली तरी त्यातून विधानपरिषदेच्या एका आमदारकीच्या जागेच्या गणिताची गोळाबेरीज आणि तयारीही जोराने सुरू आहे. काँग्रेसच्या प्रचारात नसलेले विद्यमान विधानपरिषद सदस्य आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून निवडून जाण्याचा जिल्हय़ातील एका जागेवर पुन्हा दावा ठोकला आहे. तर त्यांच्या पक्षविरोधी कारवायांवर विरोधकांनी ओरड ठोकण्यास सुरुवात केल्याने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसमधील यादवी उफाळली आहे. या परिस्थितीचा लाभ उठवत आमदार पुत्रापाठोपाठ आमदार पित्याच्या हाती कमळ देण्याची तयारी भाजपने चालवली आहे.
महापालिकेच्या ८१ प्रभागांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच जानेवारी महिन्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या एका जागेचे राजकीय गणितही बांधले जात आहे. जिल्हय़ातील एकमेव महापालिका, १० नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी निवडून द्यावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक सदस्य विजयी होऊन विधानपरिषदेत पोहोचणार आहे. या एकमेव जागेवरून आमदारकीचा टिळा भाळी लावण्यासाठी जिल्हय़ातील आघाडीच्या नेत्यांनी राजकीय डावपेच आखले आहेत. त्यासाठी महापालिकेत आपल्याला मानणारे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा उभी केली आहे.
काँग्रेसचे विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांनी सदरची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविण्याची तयारी असल्याचे त्यांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना सांगितले आहे. तर महाडिक हे पक्षाच्या प्रचारात उतरलेले नाहीत, महाडिक कुटुंबीय वेगवेगळय़ा पक्षात विखुरलेले आहेत, याकडे लक्ष वेधत त्यांचे कट्टर विरोधक माजी मंत्री सतेज पाटील यांनी रान उठवले आहे. काँग्रेसच्या प्रचार सभांत महाडिकांना लक्ष्य केले जात आहे. एकूण ३६१ सदस्यांपकी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या ९३ असून महापालिका निवडणुकीनंतर त्यात लक्षणीय वाढ होणार असल्याने महाडिक, सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना विधानपरिषदेच्या या जागेचे वेध लागले आहेत. यामुळे काँग्रेस पक्षातील उखाळय़ापाकाळय़ा निवडणुकीत चच्रेचा विषय बनल्या आहेत.
महापालिका निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांनी घडय़ाळ चिन्ह स्वीकारले आहे. या पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांना विधानपरिषदेच्या जागेवर उभे करून त्यांच्या हाती घडय़ाळ बांधण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्यातरी शंभराहून अधिक सदस्य असून महापालिकेत २०-३० सदस्य विजयी होतील अशी त्यांना खात्री असल्याने त्या आधारे पक्षाचा आमदार निवडून येईल अशी खात्री व्यक्त केली जात आहे. राज्यातील आठ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित लढण्याचे धोरण स्वीकारले आहे. जिल्हय़ात राष्ट्रवादीची सदस्यसंख्या अधिक असल्याने आघाडीचा उमेदवार पक्षाचाच असेल, असा दावा केला जात आहे.
भाजपकडे सध्या जिल्हय़ात केवळ ६ मते असतानाही त्यांनी या निवडणुकीवर डोळा ठेवला आहे. आमदार महाडिक यांना उमेदवारी देण्याचे संकेत गृहराज्यमंत्री राम िशदे यांनी दिले आहेत. ही निवडणूक अर्थपूर्ण व्यवहाराच्या वळणाने जात असते. त्यामध्ये महाडिक तरबेज आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांच्या हाती कमळ दिल्यानंतर आता त्यांचे पिता महादेवराव महाडिक यांच्या हातीही कमळ देण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, तो जिल्हय़ाच्या राजकारणाला दणकेबाज वळण देणारा ठरेल. अर्थात या साऱ्या निवडणुकीत सगळे महाडिक कोणत्या नजरेतून पाहतात यावर बरेच अवलंबून आहे

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-10-2015 at 03:30 IST

संबंधित बातम्या