अठरा वर्षांच्या कालावधीमध्ये अठरा विकासाची कामे केल्याचे आमदार महादेवराव महाडीक यांनी दाखवावेत, असे आवाहन त्यांचे विधानपरिषदेचे प्रतिस्पर्धी उमेदवार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले.
स्थानिक स्वराज्य संस्था गटातून निवडून येणाऱ्या सदस्यांची जबाबदारी शहरांच्या विकासाबाबत सर्वागीण स्वरूपाची असली पाहिजे. मात्र, सलग अठरा वष्रे आमदारकी असूनही महाडीक यांना विकासाची कोणतीच कामे करता आली नसल्याने ते निष्क्रिय, निष्प्रभ लोकप्रतिनिधी ठरतात, असा टोला लगावून पाटील म्हणाले, शहरीकरणाचा वेग वाढत असल्याने महापालिका, नगरपालिका यांच्या समोरील आव्हाने वाढत चालली आहेत. शहर विकास आराखडा, प्रादेशिक विकास आराखडा, कर्मचाऱ्यांचे पगार, शासकीय योजना राबवताना येणाऱ्या स्वनिधीची समस्या असे अनेक उग्र प्रश्न निर्माण झाले असून त्याकडे दुर्दैवाने या आमदारांचे लक्ष गेलेले नाही. शहरांच्या समस्या, विकासाच्या प्रश्नांना विधिमंडळात आवाज उठविणे अपेक्षित असताना महाडीक यांची ७२ टक्के अनुपस्थिती राहिली असून अठरा वर्षांत त्यांनी सभागृहामध्ये एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. यावरून त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थाबाबतची आस्था व आकलन याचे दर्शन घडते. स्थानिक स्वराज्य संस्थांची ही कोंडी फोडून सक्षम लोकप्रतिनिधी सभागृहात जावा यासाठी ही निवडणूक लढवत असून नगरसेवकही माझ्यासारखा सुजाण सदस्य सभागृहात जावा, या अपेक्षेने पाठिंबा दर्शवत असल्याने विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, सतेज पाटील यांनी इचलकरंजी काँग्रेस भवनामध्ये नगरसेवक, सुकाणू समिती सदस्य यांच्या समवेत बठक घेऊन आपली निवडणूक लढवण्यामागची भूमिका स्पष्ट करून विजयाचे आवाहन केले. या वेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रकाशराव सातपूते, सतीश डाळ्या, अशोक सौंदत्तीकर, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, गटनेते बाळासाहेब कलागते, पक्षप्रतोद सुनील पाटील, शशांक बावचकर उपस्थित होते.