कौटुंबिक वादातून जावयाचा पत्नीसह सासू-सासऱ्यांवर हल्ला, सासऱ्याचा मृत्यू

कोरवी गल्लीत धोंडीराम रावण, त्यांची पत्नी राधा रावण राहतात. धोंडीराम यांची मुलगी रुपाली पाटीलचे अनिल पाटील याच्याशी १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

(संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र)

इचलकरंजीत कौटुंबिक वादातून जावयाने पत्नी आणि सासू- सासऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला असून सासू आणि पत्नीची प्रकृती गंभीर आहे. हल्ल्यानंतर जावई पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातील कोरवी गल्लीत धोंडीराम रावण, त्यांची पत्नी राधा रावण राहतात. धोंडीराम यांची मुलगी रुपाली पाटीलचे अनिल पाटील याच्याशी १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. धोंडीराम आणि अनिल यांचे घर जवळच आहे. रुपाली आणि अनिलला पाच वर्षांची मुलगी देखील आहे. अनिल पाटील आणि रुपालीमध्ये वाद सुरु आहे. रविवारी देखील त्यांच्यात वाद झाला होता. रुपाली तिच्या माहेरी गेली होती. रात्री उशिरा अनिल धोंडीराम यांच्या घरी गेला. त्याने सासरे धोंडीराम, सासू राधा आणि पत्नी रुपाली या तिघांवर कोयत्याने वार केले. सुदैवाने या हल्ल्यातून त्याची पाच वर्षांची मुलगी बचावली.

अनिलने धोंडीराम यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याची माहिती समजताच परिसरातच राहणाऱ्या अन्य नातेवाईकांनी जखमींना रुग्णालयात नेले. हल्ल्यानंतर अनिल पसार झाला आहे. तर धोंडीराम रावण यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर रुपाली आणि राधा या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर कोल्हापूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man attack wife and in laws with sharp weapon in ichalkaranji over family dispute

ताज्या बातम्या