मराठी भाषकांच्या विरोधापुढे कर्नाटक झुकले
बसस्थानक नवीन करताना तिथला हटवलेला मराठी फलक पुन्हा लावण्याच्या निपाणीकरांच्या लढाईस अखेर यश आले आहे. कर्नाटक सरकारने बांधलेल्या या नूतन बसस्थानकावर ‘निपाणी बसस्थानक’ हा मराठीतील फलक पुन्हा झळकू लागला आहे.
निपाणी हे बेळगावनंतरचे सीमालढय़ातील प्रमुख नाव आहे. निपाणीतील जुने बस स्थानकाची इमारत पाडून तिथे कर्नाटक सरकारने नुकतीच नवी अद्ययावत इमारत उभी केली. परंतु जुन्या बसस्थानकावर मराठी भाषेत असलेला ‘निपाणी बसस्थानक’ असलेला हा फलक या नव्या इमारतीवर लावण्यात आलेला नव्हता. केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेतीलच फलक लावण्यात आले होते. कर्नाटक सरकारचे कृत्य लक्षात येताच याची शहर आणि परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली. मराठी भाषकांकडून या बसस्थानकावर मराठी भाषेतील फलक लावण्याची मागणी जोर धरू लागली. परंतु याकडे कर्नाटक शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने मराठी भाषकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. या दरम्यानच या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रमही जाहीर झाल्यावर या अस्वस्थेचे रूपांतर संतापामध्ये होऊ लागले. यामुळे मराठी भाषकांकडून थेट स्वरूपात तसेच ‘समाजमाध्यमां’वर प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.
मराठी भाषकांच्या अस्मितेला पुन्हा एकदा डिवचण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सर्वत्र होऊ लागली. कानडीचेच वर्चस्व सिद्ध करण्याच्या या प्रयत्नाला मराठी भाषकांनी पक्षभेद विसरून प्रखर विरोध सुरू केला. बसस्थानकात येणारे प्रवासी हे अधिकतर मराठी भाषक आहेत. त्यांना या कानडी फलक-सूचनांमुळे काहीच कळणार नसल्याने सर्वत्र संताप होऊ लागला होता. या आगाराचे दैनंदिन उत्पन्न हे या मराठी भाषकांवरच असताना त्यांना डिवचण्याच्या या प्रकाराचा सर्वत्र निषेध होऊ लागला. पण याबाबत कर्नाटक शासन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर मराठी भाषकांनी या नव्या बसस्थानकावर बहिष्काराचे अस्त्र उगारले. या प्रकारचे ‘संदेश समाजमाध्यमां’वर उमटू लागले. या साऱ्यांमुळे कर्नाटक शासनालाही जाग आली आणि त्यांनी कन्नड, इंग्रजीबरोबर ‘निपाणी बसस्थानक’ हा नामफलकही या इमारतीवर लावला. मराठीतील हा फलक लागताच त्यांचे मराठी भाषकांनी जोरदार स्वागत केले. भगवे ध्वज घेत या घटनेच्या प्रीत्यर्थ शहरातून मिरवणूक काढण्यात आली.