भागीदाराच्या बनावट सह्यांच्या आधारे कंपनीतील त्याचे संचालक पद रद्द करून ९ कोटी ९८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील व्यापारी कुटुंबातील तिघांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद अरिवद पांडुरंग पाटील (रा. नंदनवन बिल्डिंग, विले पाल्रे, मुंबई) यांनी दिली न्यायालयात दिली होती.
विश्वास किसन तिवारी (वय ६३), बिना विश्वास तिवारी (वय ६१), सोहन विश्वास तिवारी (वय २७, सर्व रा. अंबाई टँक, कोल्हापूर) न्यायालयाच्या आदेशाने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, की विश्वास तिवारी व कमलेश गेरू जसवाल यांनी २००५ साली दसरा चौक येथे भागीदारीमध्ये आर्या वाइन्स प्रा. लि. नावाची कंपनी सुरू केली. या माध्यमातून यानंतर २०११ साली जसवाल यांनी कंपनीमधून आपली भागीदारी काढून घेतली होती. याचदरम्यान तिवारी यांचे नातेवाईक असणारे अरिवद पाटील यांनी आर्या वाइन्समध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. पाटील यांच्या मालकीच्या कांचन डिस्ट्रिब्युटर कंपनीच्या माध्यमातून आर्या वाइन्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. आर्या वाइन्समध्ये वेळावेळी ९ कोटी ९८ लाख रुपयांची गुंतवणूक करत पाटील कंपनीचे संचालक बनले.
यानंतर तिवारी यांनी आपल्या पत्नी बिना तिवारी, मुलगा सोहन तिवारी यांना कंपनीमध्ये संचालक करून घेतले. काही दिवसांनंतर या तिघांनीही पाटील यांच्या बोगस सह्यांच्या आधारे पाटील यांना कंपनीच्या संचालकपदावरून काढून टाकत असल्याचा खोटा ठराव तयार केला.
व तो मान्यतेसाठी दि रजिस्ट्रार ऑफ कंपनी डेक्कन जिमखाना बिल्डिंग पुणे येथे दाखल केला. ही बाब पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार कोल्हापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केली.