गेला आठवडाभर कोसळणाऱ्या पावसाने कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात गुरुवारी दुपारी तीन वाजता ‘दक्षिणद्वार सोहळा’ झाला. श्री गुरुदेव दत्तच्या गजरात हा सोहळा सायंकाळपर्यंत चालल्याने हजारो भाविकांनी दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. यंदाच्या कन्यागत महापर्वकाळातील या पहिल्या स्नानाला गुरुवार आणि एकादशीची जोड मिळाल्याने भाविकांची गर्दी झाली होती.
पावसाने लावलेली दमदार हजेरी, तसेच धरणांतून होणारा विसर्ग यामुळे येथील कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे . कृष्णा नदीचे पाणी शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तचरणांजवळ आले आहेत . नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्री स्पर्श करून ते दक्षिणेकडे जाण्याच्या क्रियेला ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे संबोधले जाते. आज दुपारी तीन वाजता दत्तमंदिरात हा सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला . नृसिंहवाडी परिसर, शिरोळ, इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर व आलास, आदी परिसरातून भाविकांनी दुर्लभ अशा सोहळ्यात स्नानाचा आनंद घेतला. स्नानासाठी महिलांचाही मोठा सहभाग होता . दत्तदेव संस्थानमार्फत भाविकांना सुलभ स्नान होण्यासाठी रांगेची व सुरक्षारक्षकांची व्यवस्था करण्यात आली होती.



