कोल्हापूर महापालिका संचालित के.एम.टी. या शहर बसची धडक बसल्याने दुचाकीवरून जाणारी वृद्ध व्यक्ती जागेवरच ठार झाली. हा अपघात रविवारी फुलेवाडी येथे घडला. प्रमोद तुकाराम घटे, वय ६५ असे त्यांचे नाव आहे.
घटे हे फुलेवाडी येथील बसच्या चौथ्या थांब्याजवळ राहतात. रविवारी ते बाजारातून भाजी खरेदी करून दुचाकीवरून घरी परत येत होते. ते फुलेवाडी येथील दुसऱ्या थांब्याजवळ आले असता समोरून येणाऱ्या बसची धडक बसली. यामध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
अपघातात ११ प्रवासी जखमी
शेणवडे येथे रविवारी झाडाला एस.टी.ची धडक बसून झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून येथील सी.पी.आर. इस्पितळात दाखल करण्यात आले. भगवान विष्णू सावंत, वय ६५, रा. आसळज यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उर्वरित प्रवाशांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले.
अपघातात ३ जखमी
शाहूवाडी तालुक्यातील धोपेश्वर जवळ एस.टी. व ट्रकची समोरासमोर धडक झाली. रविवारी दुपारी झालेल्या या अपघातात तिघे जण जखमी झाले. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. पोलिसांनी ती दूर केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
