करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील दत्त मंदिरासमोरील अत्यंत जुना औदुंबर वृक्ष बुधवारी दुपारी कोसळला. या मध्ये इचलकरंजी येथून आलेल्या दोन महिला भाविकांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी दोन तास मोहीम राबवून वृक्ष बाजूला केला.
महालक्ष्मी मंदिरात दत्त मंदिर आहे. याची मालकी महंत कुटुंबीयांकडे आहे. त्यांनी या औदुंबर वृक्षाची निगा व्हावी यासाठी झाडाभोवती ग्रिल बसवले होते. आज दुपारी हा जुना वृक्ष कोसळला .याचवेळी येथून जाणाऱ्या दोन महिलांच्या अंगाला झाडाच्या फांद्यांचा झटका बसला. त्यांच्यावर डॉ. सचिन चौगुले यांनी मोफत उपचार केले. हा प्रकार वगळता फारशी हानी झाली नाही. ईदची सुटी असूनही आज मंदिरात भाविकांची संख्या कमी होती.
मंदिरातील लोकांनी बाग विभागाशी संपर्क केला पण ईदची सुटी असल्याने कोणीही उपलब्ध झाले नाही. अखेरीस देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी व सुरक्षा रक्षक यांनी दोन तास राबून झाडाच्या फांद्या बाजूला केल्या. भाविकांना त्रास न होता त्यांनी हे काम केले.