कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडे असणाऱ्या वळीवडे गावामध्ये पंचगंगा नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. रसायन युक्त सांडपाण्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. काही मासे तडफडून मरत आहेत. जीवन – मरणाच्या वाटेवर असणारे असे मासे गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. तर असे मासे खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर शहराची जीवनदायीनी असणारी पंचगंगा नदी राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये समावेश झालेली आहे. नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या घोषणा शासन पातळीवर अनेकदा केल्या जातात. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी भरीव निधी देण्याची घोषणा केली. एकीकडे घोषणांचा सुकाळ सुरू असला तरी दुसरीकडे नदीचे पाणी दूषित होणे काही थांबलेले नाही. काल रात्रीपासून नदीमध्ये रसायनिक्त सांडपाणी वाढले आहे. या पाण्यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडत आहेत. पंचांगा नदी गांधीनगर, वळिवडे भागात प्रदूषित होण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे.

हेही वाचा… कोल्हापुरात शिवजयंती उत्साहात; बोंद्रेनगरातील मराठा स्वराज्याचे आरमार आकर्षण

गेल्या वर्षीही जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांमध्ये पंचगंगा नदी अत्यंत प्रदूषित झाली होती. तेव्हा तर मृत माशांचा लांबलचक खच नदीमध्ये पाहायला मिळाला होता. तेव्हा सुरुवातीला जबाबदारी नाकारणारे प्रदूषण नियंत्रण अधिकारी मासे मृत होण्याचा प्रकार कोल्हापूर महापालिकेचा सांडपाणी प्रकल्प, ग्रामपंचायतींचे विनाप्रक्रिया नदीत मिसळणारे मैलायुक्त सांडपाणी, राजाराम सहकारी साखर कारखान्याचे प्रक्रियायुक्त सांडपाणी हे कारण असल्याचे लिहित कबूल केले होते. मात्र कार्यवाही कोणती केली जाणार याबाबत कसलाच उल्लेख केला नव्हता. लोककल्याण व संघर्ष समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला होता. आंदोलका पाठोपाठ पोलीसही मोठ्या संख्येने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांच्या दालनात आले. याला आंदोलकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांना बाहेर जाण्यास सांगितले होते.नदीतील मृत माशांबद्दल विचारणा केल्यावर आंधळे यांनी हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जबाबदारीचा हा भाग नसल्याचे सांगितले होते. त्यावर आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यप्रणालीतील संदर्भ घेऊन ही जबाबदारी याच कार्यालयाची कशी आहे हे पटवून दिले होते. याचवेळी आंदोलकांनी मृत मासे आंधळे यांच्या समोर टाकले. शासकीय प्रयोगशाळेत मृत माशांचे विच्छेदन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा… Maharashtra News Live : लोकसभा उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणाार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मोदींच्या संकल्पाला…”

आताही पंचगंगा नदीमध्ये अशीच दुरवस्था ओढवली आहे. वळीवडे गावात नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे. मृत माशांचा खच साचला आहे. असे मासे नेण्यासाठी लोकांची ही गर्दी होत आहे. मात्र हे मासे खाऊ नयेत, खरेदी केले जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.