कोल्हापूर : प्लाझ्मा उपचार प्रक्रिया यशस्वी; आठ करोनाबाधित रुग्ण झाले बरे

या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले.

कोल्हापूर : ऑनलाइन बैठकीत सहभागी झालेले पालकमंत्री सतेज पाटील.

कोल्हापूरमध्ये प्लाझ्मा (रक्तद्रव्य) उपचार प्रक्रिया यशस्वी होताना दिसत आहे. येथील सीपीआर रूग्णालयामध्ये आजअखेर ८ करोनाबाधित रुग्णांवर हे उपचार करण्यात आले. हे रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरित तिघांनाही लवकरच घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा उपचार प्रक्रिया केंद्राचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात पालकमंत्री पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूरमधून ऑनलाइन सहभागी झाले होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, “मुंबई येथील रूग्णावर अशा प्रकारचे उपचार करण्यासाठी कोल्हापूर येथून प्लाझ्मा पाठविण्यात आले होते. या उपचार प्रक्रियेत कोल्हापूर आघाडीवर असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले असून त्याला कोल्हापूर येथून चांगला प्रतिसाद मिळेल.”

यड्रावकर म्हणाले, “करोनाच्या उपचारात प्लाझ्मा उपचार प्रक्रिया महत्वाची भूमिका बजावत असून रुग्ण बरे होतात हे समाधानकारक आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Plasma treatment in kolhapur cures 8 corona positive patients aau