सत्ताधारी युती व विरोधी महाआघाडीकडून विविध कार्यक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर धर्म, जाती-पातीच्या राजकारणाला गती येते. महापुरुष, सामाजिक कार्यात वैशिष्टय़पूर्ण योगदान देणाऱ्या नेत्यांच्या उपक्रमांनाही राजकीय किनार लागते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष १ ऑगस्ट पासून सुरू होत असताना महायुती आणि महाआघाडीकडून त्याचे राजकारण केले जात आहे.

अण्णा भाऊं विषयी आस्था प्रकट करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याचा वारसदार असल्याचा देखावा करण्याची चढाओढ लागली आहे. अण्णा भाऊंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांना आणि विशेषत: मातंग समाजाला आकर्षित करण्याची चढाओढ लागली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात मोठय़ा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करून मतपेढीला साद घातली जात आहे.

अण्णा भाऊ  साठे यांचे साहित्य, कला, समाजकारण याचा मोठा प्रभाव आजही समाजावर आहे. त्यांचे साहित्य, चित्रपट याची भुरळ इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. यंदा अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि याच वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे अण्णाभाऊंचे स्मरण करीत राजकीय पोळी भाजण्याचे डावपेच सत्ताधारी व विरोधी गोटात सुरू आहेत.

अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना शासनाची सक्रियता अचानक वाढली आहे. आर्थिक घोटाळ्यामुळे आणि त्यात दोषी आढळल्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे महामंडळाचे अध्यक्ष आमदार रमेश कदम यांना तुरुंगवारी करावी लागली. महामंडळाचे काम जवळपास ठप्प झाले. कर्ज योजना थंडावल्याने नाराजी वाढत राहिली. याची दखल घेऊन अलीकडेच महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या महामंडळाला भरघोस निधी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. पाठोपाठ गोरखे यांनी साठे यांच्या जन्मगावी जाऊन अण्णांचे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे येणार असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी राज्यभर दौरा सुरू केला असून सांगली जिल्ह्य़ात आल्यानंतर ते वाटेगाव येथे जाऊन अभिवादन करणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाने अण्णा भाऊ  साठे यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी येथे करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी प्राथमिक प्रक्रियेला गती दिली आहे.

याचवेळी सांगली येथे सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी राज्य शासनाने वाटेगावमधील मागासवर्गीय वस्त्यांचा विकास करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे स्पष्ट केले आहे.

महाआघाडीचे बेरजेचे राजकारण

’ भाजपने साठे यांच्याप्रति शासन बरेच काही करीत आहे असे वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केल्यावर महाआघाडीने उपक्रम हाती घेतले आहेत. वाटेगाव येथे एका व्यापक अभिवादन सभा कार्यक्रमाचे आयोजन १ ऑगस्ट रोजी केले आहे.

’ त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, कन्हय्या कुमार यांची उपस्थिती आहे.

’ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे आणि दलितांवरील अत्याचार रोखले जावेत यावर चर्चा होणार आहे. एकूणच सरकारच्या धोरण, कामकाज पद्धतीवर आसूड ओढले जाण्याची शक्यता आहे. महाआघाडीचे सर्व नेते एका मंचावर आणून दलितांना साद घालण्याची रणनीती आहे. यासाठी साठे यांचे नातू सचिन साठे यांनी पुढाकार घेतला आहे.

’ या कार्यक्रमात महायुतीच्या कोणा नेत्यांचा समावेश नसल्याने कोणत्या दिशेने मांडणी होणार याचा अंदाज येत असून शासनाच्या विरोधात हवा निर्माण केली जाण्याची चिन्हे आहेत. सचिन साठे यांचा मानव हित विकास मंच नावाचा पक्ष आहे.

’ हा पक्ष विधानसभा निवडणुकीत महाआघाडीत समाविष्ट होणार आहे, असे संकेत सचिन साठे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिले. या घडामोडी पाहता अण्णा भाऊ  साठे जन्मशताब्दी वर्ष सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय कुरघोडय़ांनी गाजण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics over birth anniversary of anna bhau sathe zws
First published on: 01-08-2019 at 01:09 IST