कोल्हापूर : सततच्या महापुरांची समस्या नदीजोड प्रकल्प योजनेतून सुटणारी नसून या समस्येचा खोलवर अभ्यास करत त्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे त्यासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट मत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

कोल्हापूर-सांगलीतील सतच्या महापुरामागची कारणे व त्यावरील उपायांचा शोध घेण्यासाठी बुधवारी राज्यातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ, अभ्यासकांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरंदरे यांनी वरील मत व्यक्त केले.

या दोन जिल्ह्यांत सतत येणाऱ्या महापुरामागची कारणे अगोदर तपासली पाहिजेत असे सांगत पुरंदरे म्हणाले, की यासाठी कृष्णा खोरे व अलमट्टी धरण याचा समग्र अभ्यास होणे गरजेचे आहे. अलमट्टी धरणाला ‘क्लिन चिट’ देण्याचा वडनेरे समितीचा निर्णय धोरणात्मक चूक ठरू शकते.

महापूर नियंत्रण करण्यासाठी नद्याजोड प्रकल्प राबवावा का, या मुद्द्यावर पुरंदरे म्हणाले, की महापुराचे पाणी जबरदस्त वेगाने वाहत असते. त्यातील काही भाग अन्यत्र वळवून फारसा फायदा होणार नाही. नदीजोड प्रकल्प म्हणजे आणखी घातक ठरेल. पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवा म्हणणे हे अशक्यप्राय आहे. महापूर असो की कोणतीही आपत्ती शासन-प्रशासकीय यंत्रणा या प्रश्नांवर गांभीर्याने काम करत नाही. पूर परिस्थिती टाळायची झाल्यास आपत्ती नियंत्रण कायदा होणे गरजेचे आहे.

पूरक्षेत्रातील ऊस, नदीच्या नैसर्गिक पाणी साठवण क्षमता कमी, नैसर्गिक प्रवाहात निर्माण झालेले अडथळे याची बैठकीत चर्चा झाली.

वनस्पतीतज्ज्ञ मधुकर बाचूळकर, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, प्रा. सचिन पन्हाळकर, प्रा. आसावरी जाधव, गिरीश फोंडे, प्रसाद जाधव, वैभवराज राजेभोसले, संदीप देसाई, प्रकाश कांबळे, सुनील भाटवडेकर, एम. एस. पाटील, महेश जाधव, चंद्रकांत कांडकर, शिवाजीराव परुळेकर, आदम मुजावर यांनीही या वेळी आपली भूमिका मांडली.