इचलकरंजीमध्ये सौर ऊर्जेवरील आकाशकंदिलांची निर्मिती
कोल्हापूर : दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीसाठी इचलकरंजी येथील ‘डीकेटीई’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक व नैसर्गिक स्रोताचा वापर करीत सौर ऊर्जेवरील आकाशकंदील तयार केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर बनवलेले हे शंभर आकाशकंदील सध्या कुतूहलाचा विषय ठरले आहेत.
दिवाळी म्हटले की, पणती, आकाशकंदील, रोषणाई असा दिव्यांचा उत्सव सर्वत्र सुरू असतो. यातही दिवाळी सणाला घर उजळते ते आकाशकंदिलामुळे. हे आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केले जात असतात. मात्र अलीकडील काळात प्लॅस्टिक व चिनी कंपन्यांचे आकाशकंदील बाजारात आले आहेत. या कंपन्यांनी यासाठीचे दर स्वस्त केल्याने त्यांनी पारंपरिक आकाशदिव्यांपुढे आव्हान निर्माण केले आहे. हाच धागा पकडत ‘डीकेटीई’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपरिक आकाशदिव्यांना सौर ऊर्जेची जोड देत त्यात नवे आकर्षण तयार केले.
प्रयोग काय? हे आकाशकंदील आपल्या पारंपरिक रचनेतीलच असून त्यामध्ये सौर ऊ र्जेची यंत्रणा बसवलेली आहे. यामध्ये ८ तास ‘चार्जिंग’ केल्यास आकाशकंदीलमधील दिवे दोन ते तीन दिवस प्रज्वलित राहतात. हे आकाशदिवे करण्यासाठी या विद्यार्थ्यांना साधारण ३०० रुपये खर्च आला आहे. सध्या असे प्रायोगिक तत्त्वावरील शंभर आकाशकंदील बनवले आहेत.
परंपरेचे जतनही…
या आकाशकंदिलामुळे विजेची बचत तर होईलच, शिवाय या आकर्षणातून पारंपरिक आकाशकंदिलांचे जतन होणार आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये ‘डीकेटीई’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील पणत्या तयार केल्या होत्या. यंदा त्यांनी हे असे आकाशकंदील बनवले असून सध्या ते कुतूहलाचा विषय ठरले आहेत.