कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा देताना विविध समस्यांमुळे वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुनश्च घेण्यात याव्यात, या मागणीसाठी अभाविपने सोमवारी विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन केले. करोनासारख्या महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्राचे नुकसान झाले. शिवाजी विद्यापीठाने सन २०२१-२२ वर्षांची सर्व अभ्यक्रमांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. विद्यापीठाच्या परीक्षा सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी अर्जाद्वारे तक्रार केली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल चुकीचे लागले आहेत. विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे व परीक्षा पद्धतीतील चुकांमुळे हा सर्व परीक्षेतील गोंधळ निर्माण झाला आहे, असा आरोप अभाविपने आज केला.

विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी पुनश्च विद्यापीठाने परीक्षा घ्यावी. विद्यापीठाच्या प्रशासनाचे कामकाज व कामकाजाच्या पद्धतीला बदनाम करणाऱ्या प्रभारी परीक्षा नियंत्रकांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री विशाल जोशी, महानगर मंत्री दिनेश हुमनाबादे, अजय मोहिते, मेघा शिरगावे, प्रसाद लष्कर, गौरव ससे आदींनी या वेळी केली.