या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधाकृष्ण विखेंची टीका; तूरडाळ खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी

राज्य शासनाला सत्तेच्या जोरावर शेतकऱ्यांची आंदोलने चिरडून टाकता येणार नाहीत. शेतकऱ्यांकडील तूरडाळ संपेपर्यंत ती खरेदी केंद्राच्या माध्यमातून विकत घेण्याचा शब्द देऊनही राज्य शासनाने खरेदी थांबवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शासनाने तूरडाळ केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राज्य शासनाविरुद्धचा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा आज येथे दाखल झाली. कोल्हापुरातील संघर्ष यात्रेमध्ये सहभागी झालेल्या विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली.

गुजरातच्या तुलनेत राज्यातील साखर कारखानदार कमी दर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आíथक पिळवणूक करत असल्याच्या मुद्दय़ावर अजित पवार यांनी दोन्ही राज्यांतील उसाला दर  देण्याची पद्धत कारणीभूत असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, तेथील कारखान्यांची आíथक स्थिती संपन्न आहे. सहवीजनिर्मितीमध्ये ते उतरत नसल्याने त्याच्या कर्जाचा भार त्यांच्यावर नाही. शिवाय, सभासद शेतकऱ्याला आणि बिगर सभासदाला ते वेगवेगळा दर देत असतात. त्यांच्यात आणि आमच्यात नेमका काय फरक आहे याची माहिती घेण्यासाठी एक पथक गुजरातला पाठवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

तूरडाळ खरेदीतील गोंधळामुळे शेतकऱ्यांना सोसाव्या लागत असलेल्या नुकसानीसंदर्भात  पवार म्हणाले, की अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळ खरेदी करण्यामध्ये कमी पडल्याचे मान्य केले आहे, पण शासनाला केवळ चूक मान्य करून चालणार नाही तर तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. पक्षांतर्गत वादाची समाप्ती होऊ दे, अशी विनवणी करवीरनिवासिनी महालक्ष्मी चरणी केल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील उभय काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. हेच खालीपर्यंत पाझरत राहील. त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे पवार यांनी एका प्रश्नावेळी सांगितले.

अंबाबाई, मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे!

उत्तर प्रदेश सरकारने एका महिन्यात कर्जमाफी केली, मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीच्या अभ्यासासाठी अडीच वष्रे का लागतात, असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केला. कर्जमाफीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी दे, असे साकडे कोल्हापूरच्या अंबाबाईला घातले आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil slam maharashtra govt on toor dal issue
First published on: 26-04-2017 at 01:29 IST