इचलकरंजी येथील एका बडय़ा सूत व कापड व्यापाऱ्याच्या घरावर गुरुवारी विक्रीकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणी दिवसभर कागदपत्रांची छाननी करण्याचे काम सुरू होते, मात्र नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
कागवाडे मळा परिसरात बडा व्यापारी आहे. विविध फर्मद्वारे ते सूत व कापड खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. शहर व परिसरात त्यांचे सातपेक्षा अधिक गोदामे आहेत. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्रातील विक्रीकर विभागाच्या ३० जणांच्या पथकाने व्यापाऱ्याच्या निवासस्थानी छापा टाकला. या कारवाईमुळे शहरातील व्यापा-यांच्यात चांगलीच खळबळ माजली. पथकाकडून कागदपत्रांची छाननी तसेच खरेदी-व्रिक्री व्यवहाराची पडताळणी करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
खरेदी-विक्री व्यवहारातून शासनाचा कर बुडवला आहे का याची खातरजमा करण्याचे काम या पथकाकडून केले जात असल्याचे समजते. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईबाबत माहिती देण्यास नकार दिला. यापूर्वी आयकर विभागानेही सदर व्यापाऱ्याच्या पेढीवर छापे टाकले होते. काही सूत व्यापारी सुताची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्या आधारे ही कारवाई केली जात असल्याची चर्चा शहरात ऐकावयास मिळत होती.